आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी पात्र पाल्यांचे पालक प्रतिक्षेत

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६०३ शाळांमधील ३ हजार ६२५ जागांसाठी बुधवारी पुणे येथील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे ७ एप्रिल रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरटीई लकी ड्रॉ काढण्यात आला. या लकी ड्रॉ मध्ये प्रवेश निश्चित झालेल्या मुलांच्या पालकांना १५ एप्रिलपासून मेसेज जाण्यास सुरुवात झाली होती. परंतु लॉकडाऊन लागल्याने प्रवेशाची पुढील प्रक्रिया अद्याप होवू शकली नाही. ३० एप्रिलपर्यंत असलेले लॉकडाऊन पुन्हा पंधरा दिवस वाढविल्याने पालकांना प्रतिक्षा करावी लागणार आहे.

यंदा औरंगाबाद जिल्ह्यात ६०३ शाळांमध्ये ३ हजार ६२५ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यामध्ये पहिलीसाठी ३ हजार ६२१; तर प्रि प्रायमरीसाठी दोन शाळांमध्ये केवळ चार जागांची क्षमता आहे. पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी ३० मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत सुमारे ११ हजार ८६१ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी कोणत्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची संधी मिळणार यासाठी शिक्षण विभागामार्फत ऑनलाईन लकी ड्रॉ ची प्रक्रिया ७ एप्रिल रोजी पार पडली होती.

ड्रॉ द्वारे प्रवेश निश्चित झालेल्या मुलांच्या पालकांना १५ एप्रिलपासून मॅसेजेस पाठविण्यात आले . आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता नोंदणी केल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आवेदनपत्रासोबत सादर केलेल्या मोबाईल नंबरवरील मॅसेज नियमितपणे तपासावेत. प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्राप्त मॅसेजनुसार कागदपत्रे पडताळणी व प्रवेशाबाबतची इतर कार्यवाही मुदतीत पुर्ण करावी. असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले होते.परंतु कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव यामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आल्याने प्रवेशासाठी पात्र ठरलेल्याना लॉकडाऊन नंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या होत्या. मात्र पुन्हा पंधरा दिवस लॉकडाऊनची मुदत वाढवल्याने आता पुन्हा प्रवेश निश्चितसाठी पालकांना प्रतिक्षा करावी लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या