मुख्यमंत्र्याच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या घोषणेचे परभणीत स्वागत

Sanjay Jadhav

परभणी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त औरंगाबाद येथील ध्वजवंदनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमातून मंजूरीची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर लगेचच ‘आम्ही परभणीकर’च्या सदस्यांनी खासदार संजय जाधव यांच्या संपर्क कार्यालयासमोर तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करीत एकच जल्लोष केला.

परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा बहाल करीत वैद्यकीय महाविद्यालय जाहीर करावे यासाठी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्यासह सर्वपक्षीय नेतेमंडळींनी ‘आम्ही परभणीकर’ या माध्यमातून आंदोलन केले होते. यात खासदार जाधव हे आंदोलनाच्या या टप्प्यात उपोषणाला बसणार होते. परंतु शिवसेना श्रेष्ठींनी तसेच काँग्रेसचे जेष्ठ नेते आमदार सूरेश वरपूडकर व माजी आमदार सूरेश देशमुख यांनी खासदार जाधव यांना उपोषणापासून परावृत्त केले. त्यामुळेच जाधव यांनी उपोषणाचा मार्ग स्थगित करीत मुंबई गाठली. पक्षश्रेष्ठीबरोबर चर्चा केली. परभणीकर संघर्ष समितीनेही मुंबईत विविध पातळीवर या विषयाच्या अनुषंगाने पाठपुरावा सुरू केला होता. अखेर मुख्यमंत्री ठाकरे यांनी परभणीकरांच्या या जिव्हाळ्याच्या मागणीची गांभीर्याने दखल घेतली आहे.

येथील जिल्हा शासकीय रुग्णालयास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा बहाल करीत वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्याच्या प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मान्य केला. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्य औरंगाबाद येथील ध्वजवंदनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे या विषयी मंजूरीची घोषणा केली.

महत्त्वाच्या बातम्या