कर्जबाजारी शेतकरी बापाने आत्महत्या करू नये म्हणून मुलीने संपवले स्वत:चे आयुष्य

Parbhani farmer daughter Sarika Suicide

परभणी : कर्जबाजारी शेतकरी वडिलांनी आत्महत्या करु नये म्हणून मुलीने आत्महत्या केल्याची दुख:द घटना घडली आहे. परभणीच्या पाथरी तालुक्यातील जवळाझुटामध्ये ही धक्कादायक घटना घडली. सारिका झुटे असं मृत तरुणीचं नाव असून ती बारावीत शिकत होती. आत्महत्येच्या ठिकाणी तिची सुसाईड नोट आढळली आहे.

सारिकाचे वडिल हे शेतकरी असून शेतीसाठी त्यांनी कर्ज घेतले होत. एक बाजूला कर्जाचा डोंगर तर दुसरीकडे निसर्गाचे आसमानी संकट . पाऊस नसल्यामुळे शेतातील पीकही वाळत जात होतं. त्यामुळे सारिकाच्या कुटुंबाला उत्पन्नाच कोणतही साधन शिल्लक नव्हतं. याच कर्जाच्या काळजीने वडील आत्महत्या करतील, अशी भीती सारिकाच्या मनात होती. त्यामुळे त्याआधीच तिने आपलं आयुष्य संपवलं आहे .

दरम्यान, सहा दिवस आधी सारिकाच्या काका चंडिकादास झुटे यांनी आत्महत्या केली होती. याचा उल्लेख सारिकाने सुसाईड नोटमध्ये केला आहे.

प्रिय पप्पा.
आपल्या भाऊंनी पाच सहा दिवसापूर्वी शेतातील सर्व पीक जळू गेल्यामुळे शेतात जाऊन आत्महत्या केली. तसेच आपल्या घरावर कर्जाचा बोजा, त्यात पाऊस पडत नसल्याने तुम्ही कर्ज काढून केलेली पेरणी सर्व जळून गेल्यामुळे तुमचे हाल व घरातील ताण मला बघवत नाही. आपल्या दीदीचे गेल्यावर्षी लग्न झाले, तेच कर्ज अजून फिटले नाही आणि तुमच्यावर माझ्या लग्नाची जबाबदारी असल्याने तुम्ही पण आपल्या भाऊंसारखी घटना करु नयेत, यामुळे मी माझे जीवन संपवते.