परभणी जिल्हा बँक निवडणूक; आ. बाबाजानी दुर्राणी, रामप्रसाद बोर्डीकर बिनविरोध

परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १०१ जणांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. विशेष म्हणजे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्राथमिक कृषी पतपुरवठा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि धान्य अधिकोष संस्था मतदार संघात जिंतूर तालुक्यातून माजी आमदार रामप्रसाद बोर्डिकर आणि पाथरी तालुक्यातून आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. यामुळे पाथरी आणि जिंतूर या दोन्ही तालुक्यात रामप्रसाद बोर्डीकर आणि बाबाजानी दुर्राणी हे दोघे बिनविरोध निवडून येण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २१ संचालक मंडळाची घोषणा झाली असून २२ फेब्रुवारी (सोमावार) रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे जिल्हा बँक परिसरात दिवसभर इच्छुक उमेदवार आणि समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. शेवटच्या दिवशी आमदार सुरेश वरपूडकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर. आमदार तान्हीजी मुटकुळे, जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष पंडितराव चोखट, जि.प.चे माजी अध्यक्ष राजेस विटेकर, मनपाचे उपमहापौर भगवान वाघमारे, माजी खा. शिवाजी माने, प्रेरणा वरपूडकर, भावना कदम यांच्यासह १०१ उमेदवारांनी नामनिर्देशपत्र दाखल केले. त्यामुळे आता एकूण अर्जांची संख्या १५४ एवढी झाली आहे.

आज अर्जांची छाननी
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या १५४ उमेदवारी अर्जांची छाननी आज सकाळी ११ वाजेपासून करण्यात येणार आहे. यामध्ये प्राथमिक कृषी पतपुरवठा, विवध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व धान्य अधिकोष मतदारसंघातील ८९ उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया संस्था मतदारसंघातील १३, महिला राखीव मतदारसंघातील १५ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मतदारसंघातील १० इतर मागासप्रवर्ग मतदारसंघातील ७ आणि विमक्त जाती, भ.जा.वि. म. प्रवर्ग मतदारसंघातील १४ अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.

१० मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येणार
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी १५४ अर्ज दाखल झाल्याने चांगली चुरस निर्माण होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. १० मार्चपर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर १२ मार्ज रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येईल. २१ मार्च रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून १३ मार्ज रोजी मतमोजणी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या