परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता; नगराळेंच्या अहवालात अनेक धक्कादायक खुलासे

parambeer singh

मुंबई : सचिन वाझे प्रकरणानंतर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. या बदलीनंतर परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुखांनी वाझेला १०० कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला. यानंतर परमबीर सिंग यांच्यानंतर सरकारने हेमंत नगराळे यांना मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी दिली होती.

यानंतर आता हेमंत नगराळे यांनी गृहखात्याला एक अहवाल पाठवला असून यात परमबीर सिंह यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. एपीआय सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमबीर सिंह यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत करण्यात आला असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

तत्कालीन पोलीस सहआयुक्त (गुन्हे) यांचा सचिन वाझे यांच्या नियुक्तीला विरोध असतानाही परमबीर सिंह यांनी त्यांची नियुक्ती केली, असं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान,निलंबित पोलीस अधिकाऱ्याला परत सेवेत घेतल्यास अकार्यकारी पद देण्याचे संकेत आहेत. मात्र सचिन वाझेंना सेवेत घेऊन कार्यकारी पद दिल्यामुळे विरोध झाला होता. सचिन वाझे यांना सीआययूच्या प्रमुखपद देण्याालही विरोध झाला होता. सीआययूचे रिपोर्टिंग तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे महत्त्वाच्या प्रकरणात मंत्र्यांना ब्रिफिंग करताना सचिन वाझे हे परमबीर सिंग यांच्यासोबत असायचे अशी माहितीही समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या