पंत-पुजाराची गरूड भरारी,कसोटी क्रमवारीत मोठी झेप

टीम महाराष्ट्र देशा- ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दमदार कामगिरी करणाऱ्या चेतेश्वर पुजाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी फलंदाजांच्या क्रमावारीत तिसरं स्थान मिळवलं आहे.

आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत ९२२ गुणांसह विराट कोहली अव्वल स्थानी आहे. तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तब्बल ५२१ धावांची टांकसाळ उघडणाऱ्या पुजाराच्या खात्यात ८८१ गुण जमा झाले असून त्याला तिसरं स्थान मिळालं आहे.

सिडनी कसोटीत खणखणीत शतक झळकावणाऱ्या रिषभ पंतने आणखी एक पराक्रम नावावर केला आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत भारताच्या यष्टिरक्षक-फलंदाजाने 21व्या स्थानावर झेप घेतली. सिडनी कसोटीतील शतकामुळे पंतने 17 स्थानांची गरूड भरारी घेतली. पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत नाबाद 159 धावा केल्या होत्या. त्याने या कामगिरीसह माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी व माजी यष्टिरक्षक फारूख इंजीनियर यांना मागे टाकले.