पुणे जिल्ह्यात मुसळधार; पानशेत धरण १०० टक्के भरले

Panshet_Dam

पुणे : जिल्ह्यात सुरु असणाऱ्या संततधार पावसाने पानशेत धरण १०० टक्के भरले आहे. वरसगाव धरणात ८६.८१ टक्के पाणीसाठा झाला आहे तर खडकवासला धरणात ८१ टक्के साठा झाला आहे.उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसत आहे. मागील २० दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्रीपासूनच शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यात चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे बळीराजा आता चांगलाच सुखावला आहे. त्यामुळे आता करपू लागलेल्या पिकांना आता जीवदान मिळणार आहे.रात्रीपासून बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेते ही तुडूंब भरली आहेत तर ओढ्या-नाल्यांना नद्यांनाही पूर आला आहे. पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातूनही २९०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यास येत आहे.कुकडी प्रकल्पातील डिंभे धरणातून घोडनदीत १० हजार क्युसेक्सने घोडनदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. रात्रीपासूनच धरण क्षेत्रात मुसळधार पाऊसामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जर असाच जोरदार पाऊस सुरू राहिला तर पाण्याचा विसर्ग अजून वाढविण्यात आला आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. खेड तालुक्यातील चासकमान धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरु आहे. धरणातुन भिमानदीत २२०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.