होम ग्राउंडवर पंकजा मुंडे जोरात ; तर धनंजय मुंडे बॅक फुटवर

परळी तालुक्यातील ५४ पैकी ३८ ग्रामपंचायती भाजपकडे

परळी:- ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व विरोधीपक्ष नेते .धनंजय मुंडे यांच्या वादामुळे कायमच प्रतिष्ठित असलेली परळी मतदार संघातील प्रत्येक निवडणूक ही महत्वाची मानली जाते त्याप्रमाणे पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमधे परळी मतदारसंघातील सत्तर टक्के ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला असून राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेल्या इंजेगाव, डाबी यासह अनेक ग्रामपंचायती भाजपकडे आल्या आहेत. पंकजा मुंडे यांची ग्रामीण भागावरील पकड आणखी मजबूत झाली आहे व याचा फायदा ग्रामीण भागात भाजपला झाला आहे.

तालुक्यातील 74 ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान झाले होते. पहिल्यांदाच मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले होते. यापूर्वी बिनविरोध निवडून आलेल्या पाचपैकी चार ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या होत्या.

तालुक्यातील ५४ पैकी ३८ ग्रामपंचायती भाजपकडे आल्या आहेत. अस्वलांबा, बेलंबा, पिंपळगाव गाढे, कौडगाव साबळा, कासारवाडी रामेवाडी, नागदरा, खोडवा सावरगाव, पाडोळी हसनाबाद, वाका, तडोळी, कन्हेरवाडी, जिरेवाडी, इंजेगाव, हाळम, डाबी तर मतदारसंघातील धानोरा ता. अंबाजोगाई, धसवाडी,कातकरवाडी, वाघाळा, पिंपरी, तडोळा आदी ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला.

परळी तालुक्यातील भाजपकडे बिनविरोध आलेल्या ग्रामपंचायतीमध्ये देशमुख टाकळी, मैंदवाडी, टोकवाडी हेळंब, गुट्टेवाडी, कुसळवाडी यांचा समावेश आहे. त्यामुळे होम पिचवर पंकजा मुंडे जोरात पहायला मिळत आहेत.

You might also like
Comments
Loading...