‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’

टीम महाराष्ट्र देशा : देशभरात लोकसभा निवडणुकीचे रण तापले आहे. अवघे काही दिवसच लोकसभा निवडणुकींना शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक पक्ष आणि उमेदवार जय्यत तयारीला लागला असून प्रचार सभांमधून टिकांच्या तोफा डागत आहे. अशीच एक जहरी टीका पंकजा मुंडे यांनी भाऊ धनंजय मुंडे यांच्यावर केली आहे. हिंमत असेल तर लोकसभा लढवा असं म्हणत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना आव्हान दिलं आहे. पंकजा मुंडे बीड येथील एका प्रचार सभेत बोलत होत्या.

यावेळी पंकजा म्हणाल्या की, तुम्ही स्वत: लोकसभा निवडणूक का लढवत नाही? उमेदवारी अर्ज भरायला आणखी एक दिवस बाकी आहे. तुम्ही स्वत: मैदानात उतरा आणि जनता कोणाच्या मागे आहे, हे बघा अस म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना आव्हान दिले आहे. तसेच मी वडिलांचा गड बांधला, त्यांनी चौथरा तरी बांधला का? असा सवालही पंकजा मुंडे यांनी यावेळी विचारला.

दरम्यान सोमवारीच प्रीतम मुंडे यांनी बीड लोकसभा मतदार संघामधून उमेदवारी अर्ज भरत प्रचाराचे रणशिंग फुकले. यावेळी प्रीतम मुंडे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत विरोधकांना चांगलाच दणका दाखवला.