गाफील राष्ट्रवादीला पंकजा मुंडेंचा दणका!

pankaja and dhananjay munde ramesh karad

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी चाणक्य नीतीचा वापर करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांना जोरदार झटका दिला. विधानपरिषद निवडणुकीमधून रमेश कराड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला तोंडघशी पडावे लागले. रमेश कराड हे स्व. गोपीनाथ मुंडेंच्या जवळचे होते. त्यांना भाजपातून राष्ट्रवादीमध्ये आणण्यात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र पंकाजाताईनी व्यवस्थापन कौशल्याचा उपयोग करून धनंजय मुंडेना जोरदार झटका दिला. कराड यांनी अचानक अर्ज मागे घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे.

कराड यांना उमेदवारी दिल्यानंतर पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडले होते “आता भविष्यात कोणाला भाऊ मानणार नाही, रमेश कराड यांनी भाजपा सोडल्यामुळे आपल्याला धक्का बसला अशा भ्रमात जे आहेत, त्यांनाच धस यांच्या उमेदवारीमुळे धक्का बसला आहे” असे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र अवघ्या पाच दिवसात पडद्यामागील सूत्र एवढ्या वेगाने बदलेले, आणि कराड यांनी सोमवारी लातूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

या सर्व प्रकारचे आधीच नियोजन असल्याची राजकीय चर्चा रंगली आहे. याला जबादार राष्ट्रवादीचा गाफीलपणा आणि पंकजा मुंडे यांचे राजकीय कौशल्य असल्याच्या चर्चेला वेग आला आहे. धनंजय मुंडे यांच्यासाठी हि निवडणूक प्रतिष्ठेची होती. कारण कराड यांना भाजपमधून फोडून राष्ट्रवादीमध्ये आणण्यात धनंजय मुंडेंचा मोठा हात होता. लातूरच्या जागेसाठी राष्ट्रवादीने परभणी-हिंगोलीची जागा काँग्रेससाठी सोडली होती. मात्र, आता रमेश कराड यांनीच माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच गोची झाली आहे.

आतापर्यंत पंकजा मुंडे आणि भाजपने, धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीवर केलेली सर्वात मोठी कुरघोडी आहे. या घटनेचे पडसाद येणाऱ्या महाराष्ट्राच्या राह्कारणात नक्कीच दिसतील. दरम्यान, अशोक जगदाळे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र, ते आता काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार असतील, असे धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने हा पर्याय नाईलाजाने स्वीकारला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक रमेश कराड यांना गळाला लावण्यात यशस्वी झाले. मात्र आज राष्ट्रवादीने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतल्याचे चित्र आहे. कराड यांनी बंधुप्रेम जोपासल्याची सुद्धा जोरदार चर्चा सुरु आहे. कारण कराड हे पंकजा मुंडे यांच्या अत्यंत जवळच्या वर्तुळातील होते. पंकजाताई कराड यांना आपल्या भावासारखं मानायच्या. तब्बल ११ वर्षे ते पंकजांसोबत होते. मात्र स्व. गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर कराड यांच्यावर पक्षाने दुर्लक्ष केले, असे मत कराड यांनी केले होते.

विधानपरिषदेच्या जागेसाठी रमेश कराड यांना उमेदवारी देण्यासाठी अनुकूल नसल्याचं बोललं जात होते. रमेश कराड हे लातूर जिल्हा बँकेची निवडणूक नाणेफेकीत हरले. लातूर ग्रामीण मतदार संघातून दोन वेळा भाजपकडून निवडणूक लढवली, मात्र पदरी पराभवच पडला. रमेश कराड यांचे पंकजा मुंडें व्यतिरिक्त भाजपातील इतर कुणाशी असे संबंध नाहीत, जे त्यांच्या मदतीला धावून येतील. याचाच फायदा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आणि रमेश कराड यांना उमेदवारी देऊन धनंजय मुंडे यांनी मोठी राजकीय अयशस्वी खेळी खेळली. पंकजा मुंडे यांनी अतिशय सावधगिरीने राजकारण करत धनंजय मुंडेनाच नाही तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला मात दिली आहे.

बीड-उस्मानाबाद-लातूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या होवू घातलेल्या निवडणुकीसाठी भाजपाकडून माजी मंत्री सुरेश धस यांनी उमेदवारी अर्ज भरला. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या रूपाने भाजप आणि राष्ट्रवादी वादात अतिशय प्रतिष्ठेच्या ठरलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्यामुळे सुरेश धस यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी आष्टीत सुरेश धस यांच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चा केली होती. त्यानंतर धस यांचा भाजपमध्ये येण्याचा मार्ग मोकळा झाला होता. बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे यांची जादूची कांडी प्रसिद्ध होती. ही कांडी फिरताच काही मंडळी उघडपणे तर काही मंडळी आपापल्या पक्षात राहून भारतीय जनता पक्षाला मदत करत असत. तोच खाक्या आता पंकजाताई मुंडे यांनी सुरेश धस यांच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरविला.