पंकजा मुंडेचा धनंजय मुंडेना झटका ! रमेश कराड यांचा उमदेवारी अर्ज मागे

बीड: रमेश कराड यांनी आश्चर्यकारकरित्या विधानपरिषद निवडणुकीतून उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला वेग आला आहे. काहीदिवसांपूर्वी रमेश कराड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर पक्षाने त्यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी देखील दिली होती.

कराड यांना लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमदेवारी दिली होती. त्यांच्या विरोधात भाजपकडून सुरेश धस यांना उमदेवारी मिळाली होती. गोपीनाथ मुंडेंचे खंदे समर्थक असलेल्या रमेश कराड यांना राष्ट्रवादी काँग्रेसने परभणीची बाबाजानी दुर्राणी यांची जागा सोडून विधानपरिषदेचं तिकीटही दिले होते. मात्र आता कराड यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे वांदे झाले आहेत.

ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्याने, या मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. कारण वेळ निघून गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडे आता उमेदवारच नाही. रमेश कराड यांच्यासोबत डमी अर्ज भरलेले अशोक जगदाळे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील.

कोण आहेत रमेश कराड?

रमेश कराड हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. पंकजा मुंडे या विधानपरिषदेच्या जागेसाठी रमेश कराड यांना उमेदवारी देण्यासाठी अनुकूल नसल्याचं बोललं जातं. रमेश कराड हे लातूर जिल्हा बँकेची निवडणूक नाणेफेकीत हरले.

लातूर ग्रामीण मतदार संघातून दोन वेळा भाजपकडून निवडणूक लढवली, मात्र पदरी पराभवच पडला. रमेश कराड यांचे पंकजा मुंडेंव्यतिरिक्त भाजपातील इतर कुणाशी असे संबंध नाहीत, जे त्यांच्या मदतीला धावून येतील. याचाच फायदा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. रमेश कराड यांना उमेदवारी देत धनंजय मुंडे यांनी मोठी खेळी खेळली होती.

Gadgil