जर कोणी बघितलं तर त्याला जबरदस्त जवाब देणार, ‘त्या’ शपथेने पंकजा मुंडे संतापल्या

blank

मंबई : आज जागतिक प्रेम दिवस म्हणजेच ‘व्हॅलेंटाईन्स डे. आपल्या मनातील प्रेम भावना प्रत्येक प्रियकर- प्रेयसी ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या दिवशी व्यक्त करत असतात. मात्र या जागतिक प्रेमदिनाच्या दिवशीच अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील महिला आणि कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या निमित्ताने प्रेमविवाह आणि हुंडा घेऊन लग्न न करण्याची शपथ घेतली आहे. विशेष म्हणजे शिक्षकांनीच या विद्यार्थीनीना हि शपथ दिली आहे.

मात्र भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘शपथ मुलींनाच का? आणि ती ही प्रेम न करण्याची…’ असे म्हणत यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ट्वीट करत त्यांनी याबाबत आक्षेप नोंदविला आहे. ” अमरावतीतील चांदुर येथील शाळेत मुलींना प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ हा कमालीचा विचीत्र प्रकार घडला. शपथ मुलींनाच का? आणि ती ही प्रेम न करण्याची…’ असे ट्वीट करत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

तसेच, ‘मुलींपेक्षा मुलांनी शपथ घ्यायला पाहिजे की एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास देणार नाही, कोणावर ऍसिड फेकणार नाही, जिवंत जळणार नाही, वाकड्या नजरेने बघणार नाही आणि जर कोणी बघितलं तर त्याला जबरदस्त जवाब देणार.. असेही त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हंटले आहे.

दरम्यान, ‘मी अशी शपथ घेते की, माझा माझ्या आई-वडिलांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे समोर घडणाऱ्या घटना लक्षात घेता, मी प्रेम व प्रेम विवाह करणार नाही. त्याशिवाय मी माझे लग्न हुंडा घेणाऱ्या मुलाशी करणार नाही. सामाजिक परिस्थितीमुळे आज माझे लग्न माझ्या कुटुंबाने हुंडा देऊन केले, तर भावी पिढीतील एक माता म्हणून मी माझ्या होणाऱ्या सूनेकडून हुंडा घेणार नाही. तसेच मुलीसाठी हुंडा देणार नाही. एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी ही शपथ घेते’ अशी शपथ महाविद्यालयातील शिक्षकांनीच विद्यार्थिनींना दिली  आहे.