पंकजा मुंडेनी उडविली राहुल गांधींची खिल्ली,म्हणाल्या राहुल गांधी म्हणजे अंगापेक्षा बोंगा जड

टीम महाराष्ट्र देशा : राहुल गांधी म्हणजे अंगापेक्षा बोंगा जड अशी टीका राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. तर नाचता येईना अंगण वाकडे ही म्हण राहुल गांधींनाच लागू पडते अशी टीका पूनम महाजन यांनी केली आहे. कलर्स मराठीच्या अस्सल पाहुणे इरसाल नमुने या भागात या दोघींची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीचे काही अंश सध्या सोशल मीडियावर प्रसारित होत आहेत. याच दरम्यान मकरंद अनासपुरेने या दोघींना म्हणींबाबत एक प्रश्न विचारला. या म्हणी कोणत्या राजकीय नेत्याला लागू पडतात हे तुम्ही सांगा असे म्हणत या म्हणी विचारण्यात आल्या ज्यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणजे अंगापेक्षा बोंगा जड अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली.

कोणती म्हण कोणत्या राजकीय नेत्याला लागू पडते असे विचारताना मकरंद अनासपुरेने पूनम महाजन यांना ‘नाचता येईना अंगण वाकडे’ या म्हणीबाबत विचारले. त्यावेळी पूनम महाजन म्हटल्या, एका पार्टीचे अध्यक्ष आहेत. खूप प्रयत्न करतात, आज्ञाधारी पुत्रही आहेत. पण कधी कधी बघून वाटतं की त्यांची चूक नाही. ते त्यांचं अंगणही नाही आणि त्यांचा नाचही नाही. नाव घेण्याचा माझा स्वभावच नाही असे पूनम महाजन म्हटल्या तेव्हा लगेचच पंकजा मुंडेंनी ‘पास’ म्हणता येईल का यावर असा प्रश्न विचारला आणि प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. तर जनता सूज्ञ आहे जनतेला लगेच कळेल असे पूनम महाजन यांनी म्हटलं आहे.

यानंतर मकरंद अनासपुरे यांनी पंकजा मुंडे यांच्याकडे मोर्चा वळवत त्यांना ‘अंगापेक्षा बोंगा जड’ ही म्हण कोणत्या राजकीय नेत्याला लागू पडते असा प्रश्न विचारला. त्यावर एकच उत्तर द्यायचं का सगळ्यांनी? असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी विचारला तेव्हाही प्रेक्षक पुन्हा एकदा खळखळून हसू लागले.