धाकट्या पंढरीसाठी पंकजा मुंडेंनी केलेल्या कामामुळे त्यांच्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव !

टीम महाराष्ट्र देशा : धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणा-या श्रीक्षेत्र नारायणगड तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले असून गडाचे भक्त आणि महंतांचा मान ठेवत त्यांनी नारायण गडापासून पौंडूळ-खांबालिंबा कडे जाणा-या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून नुकताच ५ कोटी २१ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी नुकताच बीड जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत ३३० कोटी ८९ लक्ष रुपयांचा ऐतिहासिक निधी मंजूर केला आहे. यात जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आणि धाकटी पंढरी म्हणून परिचित असलेल्या नारायणगडाच्या खांबालिंबा पौंडुळ ते नारायणगड या १२ कि. मी रस्त्याच्या दर्जोन्नतीसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत ५ कोटी २१ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

खांबालिंबा पौंडुळ ते नारायणगड या रस्त्यामुळे गडाच्या भाविक भक्तांची मोठी सोय होणार असून नारायणगडाच्या भाविकांच्या प्रवास आरामदायी होणार आहे. यापूर्वी पंकजाताई यांनी गडाच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधी अंतर्गत गडाच्या विकासात भर घालणारे विविध कामे सध्या अंतिम टप्प्यात आहेत. तसेच भक्तांच्या सोयीसाठी मुलभूत विकास निधी २५/१५ या हेड अंतर्गत गडावर भक्तनिवास व सांस्कृतिक सभागृह बांधण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी दिला होता. खांबालिंबा पौंडुळ ते नारायणगड या रस्त्याच्या दर्जोन्नतीसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत ०५ कोटी २१ लक्ष रुपयांचा भरीव निधी मंजूर केल्याने पंकजा मुंडे यांनी नारायणगड आणि महंताचा सन्मान राखला असल्याची भावना व्यक्त होत आहे.