कॅबिनेट मधील फुंडकरांची रिकामी खुर्ची पाहून पंकजा मुंडे गहिवरल्या

काही क्षणातच लक्षात आले ...एकदम मी चरकले..एक पाटी कमी होती माझ्या व सुधीर भाऊंच्यामधील पाटी नव्हती... रिकामी खुर्ची व नसलेली पाटी...

टीम महाराष्ट्र देशा: राज्याचे कृषिमंत्री पांडूरंग फुंडकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यामुळे राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी त्यांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या नसण्याने आजही अनेक नेत्यांना गहिवरून येते. फुंडकर कॅबिनेटमधे पंकजा मुंडे यांच्या बाजूला बसायचे. त्यामुळे मंत्रिमंडळातील रिकाम्या खुर्चीकडे बघून आज पंकजा मुंडे यांना गहिवरून आले.

पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना शब्दात व्यक्त केल्या आहेत…

आज मंत्रिमंडळ बैठकीत आले आणि माझ्या जागेवर बसले. कामाच्या व्यापामुळे पटकन लक्षात नाही आले…माझ्या डाव्या बाजूला ना. सुधीर मुंनगुंटीवार यांच्याशी चर्चा करत होते… माझ्या आणि त्यांच्या मधील खुर्ची रिकामी होती… काही क्षणातच लक्षात आले …एकदम मी चरकले..एक पाटी कमी होती माझ्या व सुधीर भाऊंच्यामधील पाटी नव्हती… रिकामी खुर्ची व नसलेली पाटी भाऊसाहेब फुंडकरांची होती …एक रिकामी जागा इतकी मोठी पोकळी वाटली मला त्या क्षणी ! त्यांच्या घरच्यांच्या दुःखाची व आंतरिक पोकळीची वेदना मी समजू शकते !..काकू ,आकाश, सागर,वसू त्यांची मुलगी ..किती दुःखात असतील..खूप रडल्या बाबा गेले तेव्हा आणि आता फुंडकर काका गेले.. आम्ही तिघी बहिणी आणि ते तिघे भावंड.. आमची आई, आमचे कुटुंबीय हे शब्दात मांडू शकत नाही …. कॅबिनेट मधील खुर्ची रिकामी राहणार नाही , त्यांच्या उंचीचा नेता मिळो ना मिळो ती ही जागा भरली जाईल ,पण कुटुंबातील आणि मनातील ती जागा कोण घेईल ?.कोणी नाही.. कधीच नाही …
परत एकदा भाऊसाहेब फुंडकर ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!