आपल्या पंकजा ताई ‘मुलींच्या समर्थनार्थ’ उभ्या ठाकल्या ; वाचा काय आहे ‘प्रकरण’

blank

टीम महाराष्ट्र देशा: शाळा – कॉलेजात मुलींना प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ देणे हा कमालीचा विचित्र प्रकार आहे. ही शपथ मुलींनाच का? आणि ती ही प्रेम न करण्याची… त्यापेक्षा मुलांनी शपथ घ्यायला पाहिजे की एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास देणार नाही. कोणावर अँसिड फेकणार नाही, कुणाला जिवंत जळणार नाही. कुणाकडे वाकड्या नजरेने बघणार नाही आणि जर कोणी बघितलं तर त्याला चोख प्रत्युत्तर देणार’ अशा कडक शब्दात आपल्या भावना पंकजा मुंडे  यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

अमरावती जिल्ह्यातील चांदुर येथील महिला कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात विद्यार्थिनींना ‘मी प्रेमविवाह करणार नाही’ अशी शपथ देण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. माजी महिला-बालकल्याण मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ‘ही शपथ मुलींनाच का?’, असा खरमरीत प्रश्न विचारत या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

‘दरम्यान, व्हॅलेंटाइन डे हा प्रेम व्यक्त करण्याचा दिवस असतो. प्रेमवीरांसाठी हा दिवस म्हणजे पर्वणीच असते. अमरावतीच्या चांदुर रेल्वे येथील महिला कला व वाणिज्य महाविद्यालयाने मात्र व्हॅलेंटाइन दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थिनींना वेगळीच शपथ दिली. या महाविद्यालयाचं राष्ट्रीय सेवा योजना शिबीर सध्या टेंभुर्णा येथे सुरू असून या शिबिरात विद्यार्थिनींना अनेक शपथा देण्यात आल्या. त्यात ‘मी प्रेमविवाह करणार नाही’ ही अजब शपथ चर्चेचा विषय ठरली.पंकजा मुंडे यांनी या सगळ्या प्रकरणाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.