शहीद तौसिफ आरिफ यांच्या कुटुंबियांना पंकजा मुंडेंची मदत

टीम महाराष्ट्र देशा : परळी शहरात पांच कोटी रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पंचायत समितीच्या नूतन भव्य आणि देखण्या इमारतीचे लोकार्पण राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गडचिरोली जिल्ह्यात नक्षवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले पाटोदा येथील शहीद जवान शेख तौसिफ आरिफ यांच्या कुटुंबियांना गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे एक लाखाच्या आर्थिक मदतीचा धनादेश त्यांच्या कुटूंबियांकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच जिरेवाडी येथील सरस्वती महिला बचत गटाला दीड लाख रुपयांचे बॅंक अर्थसहाय्य यावेळी वितरित करण्यात आले. यावेळी पंचायत समितीच्या आवारात वृक्षारोपण केले.

दरम्यान, पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित नसताना नियमबाह्य उदघाटन काल रात्री काही टवाळांकडून केले गेले. राजकारणात असे कृत्य शोभनीय नाही. राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना परळी मतदारसंघासाठी एकही इमारत अथवा रस्ता मंजूर करू न शकणारे लोक माझ्या खात्यामार्फत मंजूर झालेल्या कामांचे रात्रीत उदघाटन करत आहेत. अशा लोकांना सत्ता असताना एकाही कोनशिलेवर स्वतःचे नाव का लावता आले नाही? टवाळखोरांनी केलेले उदघाटन हा तर निव्वळ बालिशपणा होता. अशी टीका पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली आहे.

राज्याच्या ग्रामविकासमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या बहीण भावामध्ये निवडणुकीपूर्वीच श्रेयवादावरून लढाई रंगल्याचे चित्र बीडमध्ये पाहायला मिळत आहे. परळी वैजनाथ येथील पंचायत समिती इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार होते. मात्र त्या अगोदरच पंचायत समितीमधील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पंचायत समिती इमारतीचे उद्घाटन केल्याने नव्या वादाला सुरवात झाली आहे.Loading…
Loading...