विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याकडे राज्याचे लक्ष

टीम महाराष्ट्र देशा : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावर दसरा मेळाव्यात समर्थकांना संबोधित करायचे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर ही परंपरा त्यांची मुलगी पंकजा मुंडे यांनी चालू ठेवली आहे. मात्र भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री आणि भगवानगड येथील दसरा मेळावा या वादाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी दसरा मेळावा हा भगवानगड येथे न घेता भगवान बाबांचे जन्मस्थळ असलेल्या सावरगाव घाट येथे घेतला .

आगामी विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता काहीच दिवसांत लागू होणार आहे. याच दरम्यान गेल्या काही वर्षांपासून राज्यात चर्चेचा विषय राहिलेला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीतील होणारा दसरा मेळावा यंदा देखील चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

या ठिकाणी भगवान बाबांचे भव्य समाथीस्थळ बांधत पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मागील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी केले आहे. या मेळाव्यास राज्याभरातील बडे नेते मंडळी, मंत्री, आमदार तसेच बहुजन समाजातून लाखो लोकं उपस्थित राहिली.यामुळे,मागील दसरा मेळाव्याची चर्चा राज्यासह देशभरात झाली होती.

दरम्यान, या वर्षाचा दसरा मेळावा हा ऐन विधानसभा निवडणुकीत येणार आहे. तसेच येणारा परळी विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे तगडे आव्हान पंकजा मुंडे यांच्यासमोर असणार आहे.या बहुचर्चित थेट बहिण भावामध्ये होत असलेल्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.त्यामुळे,मंत्री पंकजा मुंडे या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून ‘माधव’ फॅक्टरची पुर्नबांधणी करत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.

ऐन विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे ह्या आपल्या समर्थकांना मार्गदर्शन करत आपली ताकद पक्षश्रेष्ठींना दाखवून देत शक्तीप्रदर्शन करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळासह बीड जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे.याच दरम्यान,सोशल मिडियाच्या माध्यमातून मुंडे समर्थकांनी दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने लोकनेत्याच्या लेकीनं दिली आहे विकासांची साद ! चलो भगवानभक्तीगड, देऊ लाखोंचा आशिर्वाद !! चलो सावरगाव…!! अशा आशयाचा पोस्ट जोरदार व्हायरल केल्या आहेत.