टवाळखोरांनी केलेले उदघाटन हा तर निव्वळ बालिशपणा, पंकजांचा धनंजय मुंडेंना जोरदार टोला

pankaja munde and dhananjay munde

टीम महाराष्ट्र देशा : राज्याच्या ग्रामविकासमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या बहीण भावामध्ये निवडणुकीपूर्वीच श्रेयवादावरून लढाई रंगल्याचे चित्र बीडमध्ये पाहायला मिळत आहे. परळी वैजनाथ येथील पंचायत समिती इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार होते. मात्र त्या अगोदरच पंचायत समितीमधील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पंचायत समिती इमारतीचे उद्घाटन केले.

धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी उदघाटन केल्यानंतर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पुन्हा शासकीय लोकार्पण केले आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या त्या लोकार्पण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला सुरुवात होण्यापूर्वीच राजकीय द्वेषाचे चित्र बीड जिल्ह्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे.

दरम्यान, पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित नसताना नियमबाह्य उदघाटन काल रात्री काही टवाळांकडून केले गेले. राजकारणात असे कृत्य शोभनीय नाही. राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना परळी मतदारसंघासाठी एकही इमारत अथवा रस्ता मंजूर करू न शकणारे लोक माझ्या खात्यामार्फत मंजूर झालेल्या कामांचे रात्रीत उदघाटन करत आहेत. अशा लोकांना सत्ता असताना एकाही कोनशिलेवर स्वतःचे नाव का लावता आले नाही? टवाळखोरांनी केलेले उदघाटन हा तर निव्वळ बालिशपणा होता. अशी टीका पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली आहे.