तोडपाणीचे राजकारण करताना पवारांची आठवण का येत नाही ; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला

dhananjay mundhe and pankaja munde 2

टीम महाराष्ट्र देशा : राज्याच्या ग्रामविकामंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी धनंजय मुंडे याचं नाव न घेता पुन्हा त्यांच्यावर तोडपाणीचा आरोप केला आहे. लोकसभा निवडणुकीत कोणाला उभा करायचे, याबद्दल राष्ट्रवादीचे नेते अजूनही पेचात आहेत. भाषणात गप्पा ठोकणार्यांचेही उभा राहण्याचे धाडस होत नाही. उमेदवारीबद्दल विचारले की सांगतात, शरद पवारांनी आदेश दिला तर उभा राहू. अशावेळी पवारांची आठवण येते, मग तोडपाणीचे राजकारण करताना कशी त्यांची आठवण येत नाही, असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला आहे.

दरम्यान,परळी मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी सत्तेच्या माध्यमातून आपण कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. मात्र मी आणलेल्या कामांचे घाईघाईने उद्घाटन करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आटापिटा सुरू आहे. श्रेय घेण्याची एवढी हौस होती, तर मागच्या वेळी सत्ता असताना निधी का आणता आला नाही, असा सवाल पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना केला.

मांडवा येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून 96 लाख रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनांसह रस्ते, तीर्थक्षेत्र विकास व अन्य 7 कोटी 48 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आ. आर. टी. देशमुख उपस्थित होते.