एखादा पुरस्कार शेवटचाच समजून लोक मोठा खर्चिक जल्लोष करतात

पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेना टोला

टीम महाराष्ट्र देशा : एखाद्या पुरस्काराने प्रोत्साहन मिळेलही, पण तो पुरस्कार शेवटचा आहे, असे समजून लोक जल्लोष करतात, मोठ-मोठे बॅनर लावून शहर सजवतात, जाहिरातबाजीवर मोठा खर्च करतात असा टोला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांना नाव न घेता लगावला आहे.

या सगळ्यावर खर्च करण्याऐवजी पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात योगदान दिले तर ते सर्वांच्याच हिताचे ठरेल. त्यासाठी सर्वानी एकजुटीने मदत करावी असे आवाहन देखील पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांचा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर २०१८ पॉवरफुल राजकारणी हा पुरस्कार देवुन गौरव केल्याबद्दल काल परळी शहरात त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला मोठा प्रतिसाद परळीकरांनी दिला होता. मात्र, पंकजा मुंडे यांनी भावाच्या या सत्कार सोहळ्याचा खरपूस समाचार घेतला आहे.