fbpx

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांवर दरोडे घालण्याचेच काम केले – पंकजा मुंडे

परळी: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी आजवर साखर कारखाने, सुतगिरण्यांना कुलूपे लावली आहेत तर दुसरीकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी बुडवून आता शेतक-यांविषयी खोटा कळवळा दाखवणाऱ्या राष्ट्रवादीने त्यांच्यावरच दरोडा टाकण्याचे पाप केले असल्याचा घणाघात ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे. परळी मतदारसंघातील भाजपाच्या नवनिर्वाचित 66 सरपंच व साडे तीनशेहून अधिक सदस्यांचा सत्कार पालकमंञी ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज वैद्यनाथ साखर कारखाना येथे करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसकडून नुकतच बीडमध्ये मोर्चा काढण्यात आल होता. मात्र हा शेतकऱ्यांचा नसून कार्यकर्त्यांचा मेळा होता अशी टीकाही त्यांनी केली.

पंकजा मुंडें यांनी बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या शेतकरी मोर्चाचा व त्यांच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. दसरा मेळाव्यापेक्षा मोठा मोर्चा काढू अशी वल्गना करणाऱ्यांना त्या तुलनेत लोकांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. मोर्चा शेतकऱ्यांचा आणि बोलणारे दरोडेखोर असे एकूण चित्र दिसले. ज्यांनी कारखाना, सुतगिरण्यांना कुलूप लावले, शेतक-यांची एफआरपी ची रक्कम बुडवली, शेतक-यांचे संसार उद्ध्वस्त केले तेच आता खोटा कळवळा दाखवत आहेत. दारू – मटणाच्या पार्ट्या देऊन मत लाटण्याचे काम करणाऱ्या या नेत्यांनी मतदारसंघाला एका वेगळ्या वाटेवर नेऊन ठेवले आहे. जनतेने अशा प्रवृत्ती पासून वेळीचसावध होण्याची गरज आहे. ग्रामपंचायत निकालाच्या खोट्या बातम्या देणारांनी मुंडे साहेबांचे नाव नाही घेता हेड लाईन होऊन दाखवावी असे आव्हान त्यांनी दिले. ज्यांच्या हाताला यश नाही अशांनी कारखाना कसा चालवावा हे आम्हाला शिकवू असा टोलाही त्यांनी लगावला.