पंकजा मुंडे आणि सुरेश धस उसतोड मजुरांच्या प्रश्नावर आमने – सामने

सुरेश-धस

बीड: खरं म्हणजे बीड जिल्ह्याचं राजकारण कधी कुठला ‘टर्न’ घेईल याचा अंदाज लावता येणे तसे खूप कठीण आहे.अगदी रक्ताच्या भाऊ – बहिणीपेक्षा एकमेकांचा जास्त आदर असणारे मुंडे आणि धस आज एकमेकांच्या समोरासमोर उभे ठाकले आहेत.

आजच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या मजुरीमध्ये किमान २१ रुपयांच्या पुढे दरवाढ मिळाली पाहिजे, अशी मागणी करुन कामगारांनी ऊसतोडीसाठी निघण्याचे आवाहन केलं.पण लगेच आमदार सुरेश धस यांनी जोपर्यंत दीडशे टक्के भाववाढ होणार नाही तोपर्यंत एकही मजूर कामावर जाणार नाही आणि कुणी काही वेडंवाकडं करण्याचा प्रयत्न केला तर पुढे काय होईल हे सांगता येणार नाही, असा इशारा दिला.

पंकजा मुंडे यांच्या भूमिकेचा सुरेश धस यांनी जोरदार समाचार घेतला. आम्हाला जोपर्यंत दरवाढ मिळत नाही तोपर्यंत आमच्या ११ संघटनांचं आंदोलन सुरुच राहील, असा इशारा सुरेश धस यांनी दिला.

धस म्हणाले की, गोपीनाथ मुंडे ऊसतोड संघटना, महाराष्ट्र राज्य श्रमिक संघटना, तसंच माझ्यासहित ११ संघटनांच्यावतीने, ऊसतोड मजुरांच्या मजुरीमध्ये १५० टक्के वाढ करण्यात यावी, मुकादमांचं कमिशन साडे १८ टक्क्कांवरुन ३७ टक्के करण्यात यावे तसंच वाहतूकदरांची दरवाढ करुन ती दरवाढ ५० टक्के करण्यात यावी, अशी आमची मागणी असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं. तसंच साखर करखाना, मुकादम आणि ऊसतोड कामगार यांच्यातल्या व्यवहाराला कायदेशीर अधिष्ठान प्राप्त करुन द्यावी, अशीही मागणी असल्याचं धस यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांच्या बाबतीत आमचं काही एक म्हणणं नाही पण आमच्या उसतोड कामगारांच्या पोटा-पाण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे दरवाढ मिळेपर्यंत आमच्या संघटनांनी पुकारलेलं हे आंदोलन चालूच राहणार, असल्याचं सुरेश धस यांनी अगदी ठासून सांगितलं आहे.

म्हणून एकंदरीत या परिस्थितीवरून असेच म्हणू शकतो की उसतोड मजुरांच्या प्रश्नावर मुंडे आणि धस हे आमने – सामने आले आहेत.

महत्वाच्या बातम्या