पंकजा मुंडेंनी भगवान गडच्या दसऱ्या मेळाव्यासाठी राज्याला धाडले निमंत्रण

pankaja munde

टीम महाराष्ट्र दशा : या वर्षी दसऱ्याला भगवान गड येथे होणारा भाजप नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा मेळावा हा लक्षवेधी ठरणार असल्याचं दिसत आहे. कारण विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असल्याने या वर्षीच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे भगवान गडावरून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसे संबोधित करणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. याच अनुषंगाने पंकजा मुंडे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून राज्यातील समस्त भाविक भक्तांना आग्रहाचे आमंत्रण दिले आहे.

‘भगवान भक्तीगडावर ८ ऑक्टोबर २०१९ रोजी होणा-या दसरा मेळाव्याकरिता राज्यातील समस्त भाविक भक्तांना आग्रहाचे आमंत्रण ! राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जन्मभूमीत सीमोल्लंघन ही परंपरा महत्वाची आहे आणि ती भव्यच असली पाहिजे’, असा आशय लिहित पंकजा मुंडे यांनी ट्विट केले आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघातील राजकीय हालचालींना गती मिळाली आहे. परळी विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा चुरशीची लढत पाहिला मिळणार आहे. कारण भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघे बहिण भाऊ आमने सामने येणार आहेत. त्यामुळे राज्यातली ही हायव्होल्टेज लढाई असणार आहे.