‘पवारसाहेबांची सामाजिक उंची समजण्याची बौद्धिकता पंकजा मुंडेंमध्ये नाही’

pankaja munde and vandana chavan

पुणे: शरद पवार यांची राजकीय व सामाजिक उंची समजण्याची बौद्धिकता पंकजा मुंडे यांच्यामध्ये नाही. त्यामुळेच त्यांच्याकडून अशोभनीय टीका केली जात आहे. १९८४ साली लोकसभेत केवळ दोन खासदारापर्यंत रसातळाला गेलेल्या भाजप सरकारच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची चिंता करू नये, म्हणत खासदार वंदना चव्हाण यांनी पंकजा मुंडेंच्या टीकेचा समाचार घेतला आहे.

रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या २०व्या वर्धापन दिनी आयोजीत हल्लाबोल सभेत सर्वच नेत्यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला होता. याच दरम्यान हडपसर येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे उद्यानाच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी बोलत असतांना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीवर कडाडून हल्लाबोल केला. हीच टीका राष्ट्रवादीच्या नेत्यांना चांगलीच झोमल्याच दिसत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुणे शहर अध्यक्ष खा. वंदना चव्हाण यांनी पत्रक काढत पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविला आहे. त्या म्हणाल्या, पंकजा मुंडे यांनी केलेली टीका तथ्यहीन असून अत्यंत खालच्या पातळीची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील पवार साहेबांचे महत्व देशाच्या राजकारणात समजतात. पण त्यांच्या नावावर निवडून आलेल्या पंकजा मुंडेना हे समजत नाही. हे भाजपचे दुर्दैव आहे. तसेच कै. गोपीनाथ मुंडे यांचा मृत्य झाल्यानंतर पवार साहेबांनी केलेल्या मदतीची जाणीव ठेवण गरजेच आहे.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे ?

बँका तुमच्या,कारखाने तुमचे,संस्था तुमच्या मग तुम्ही हल्लाबोल कशावर करता. वर्षानुवर्षे गरिबांच्या गल्ल्यावर डल्ला मारणारे आज हल्लाबोल करत आहेत. जातीपातीचे राजकारण आजवर करून राष्ट्रवादीने स्वतःच असुरक्षित राजकारण सुरक्षित केलं. जनता भोळी असली तरी जनता वेडी नाही असा घणाघात करत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनावर जोरदार टीका केली आहे.

राष्ट्रवादीचा लवकरच समारोपाचा कार्यक्रम होईल. त्यांचे ४ खासदार आहेत त्यातले तीन स्वतःच्या जीवावर निवडून येतात. आम्हाला गांधीजी स्वच्छता अभियानाच्या बोर्डावर पहायला आवडतात यांना नोटांवर पहायला आवडतात. गरिबांचे दुखः कमी करण्यासाठी काय केलं हे दाखवावं.