fbpx

सरपंच परिषद भरवत पंकजा मुंडे करणार जोरदार शक्तिप्रदर्शन

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभेच्या तोंडावर भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे. त्यातच आता भाजपमध्ये मास लीडर असणाऱ्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ३१ जुलै रोजी शिर्डी येथे राज्यातील ४० हजार सरपंच, उपसरपंचांचा जंगी मेळावा भरवत जंगी शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि भाजपचे अन्य काही मंत्री प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

पूर्वी सरपंचांना एक हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळत असे. अलिकडेच फडणवीस सरकारने हे मानधन पाच हजार रुपये केले. ३१ तारखेच्या मेळाव्यात राज्य सरपंच परिषदेच्या वतीने या बाबत सरकारचे आभार मानण्यासाठी फडणवीस आणि मुंडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. एकीकडे शिवसेनेने पीक विम्याच्या प्रश्नाला हात घालून शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू केले असताना दुसरीकडे भाजपने राज्यातील सरपंचांना मानधनवाढ आणि मेळाव्याच्या निमित्ताने गोंजारले आहे. यापूर्वी २००३ मध्ये सरपंचांचा राज्यव्यापी मेळावा झाला होता. आता तब्बल १६ वर्षांनंतर असा मेळावा होत आहे.