फुंडकरांच्या निधनाने सामाजिक आणि राजकीय क्षेत्राचं मोठं नुकसान – शरद पवार

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं आज दुख:द निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या धक्क्यामुळे त्यांना आज पहाटे मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पहाटे 4.32 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने राज्याने एक मोठ राजकीय नेतृत्व गमावल्याची भावना आहे.

दरम्यान फुंडकर यांना शरद पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी शोकसंदेश व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केलीये. फुंडकर यांच्या निधनाने सामाजिक आणि राजकीय क्षेत्राचं मोठं नुकसान झालं असून, राज्याने मोठा नेता गमला आहे. अशा शब्दात शरद पवार यांनी फुंडकर यांना श्रद्धांजली वाहिली.

पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हंटलं आहे की, फुंडकर यांनी तीन वेळा संसदेवर प्रतिनिधीत्व केलं आहे. यावरून त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना येते. ते एक आदर्श कृषिमंत्री होते. त्यांनी सतत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. मात्र आज फुंडकर आपल्यात नाहीत याचं मला वाईट वाटत असल्याचं शरद पवार यांनी म्हंटलं आहे.