fbpx

‘काँग्रेस पक्ष सोडण्याचा विचारही मनाला स्पर्श करु शकत नाही’

निलंगा,प्रतिनिधी : काँग्रेस पक्षाने माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला भरभरुन दिलं असून जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्षपदी काम करण्याची मोठी संधी प्राप्त करुन दिल्यामुळेच आपली आज जिल्हाभरात ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडणे तर दूरच पक्ष सोडण्याचा साधा विचार देखील आपल्या मनाला कदापि स्पर्श करणार नसल्याचे स्पष्टीकरण जि.प.माजी अध्यक्ष पंडीतराव धुमाळ यांनी महाराष्ट्र देशाशी बोलताना केले. पंडीतराव धुमाळ काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून राष्ट्रवादी काँग्रेस जवळ करुन हाती घड्याळ बांधणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्तुत प्रतिनिधीने धुमाळ यांच्याशी संपर्क साधला असता ते बोलत होते.

मागील १०-१२ वर्षापासून आपण काँग्रेसमध्ये काम करत असून काँग्रेसचे आपण एक निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. त्यामुळे पक्ष सोडण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. या केवळ वावड्या आहेत. यामध्ये अजिबात तथ्य नसून आपल्या विरोधकांचे हे षडयंञ असल्याचा आरोप धुमाळ यांनी केला. आगामी निलंगा विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी आपण इच्छुक आहोत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण मोठी विकास कामे केली असून सामान्य लोकांचा संपर्क ठेवून आहोत. त्याचबरोबर आपल्या ठायी गुणवत्ता आहे. राजकीय क्षेञात काम करत असताना महत्वकांक्षा बाळगणे काही चुकीचे नाही. त्यामुळे आपण उमेदवारीची मागणी केली तर यामध्ये काय चुकीचे आहे ? असा प्रश्न उपस्थित करुन आपण तिकीट मागीतले असून पक्षाने तिकिट दिल्यास पूर्ण ताकदीने निवडणूक लढणार असल्याचा निर्धार धुमाळ यांनी बोलून दाखविला.

सरकार व पालकमंञी संभाजीराव पाटील यांच्यावरील नाराजी व डाँ.शिवाजीराव पाटील निलंगेकर, शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख व दिलीपराव देशमुख या जेष्ठ नेतृत्वाने या जिल्ह्यात केलेल्या भरीव विकास कामाच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणूकीत निलंगा मतदारसंघात बदल होवू शकतो, असा दावा जि.प.माजी अध्यक्ष पंडीतराव धुमाळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

संभाजीराव पाटील निलंगेकर हे मंञी झाल्यापासून त्यांच्या मतदारसंघातील गाठीभेठी व संपर्क अतिशय कमी झाला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध विकास कामाचे वाटप करण्यावरुन राजकीय वर्तुळात पालकमंञ्यांच्या बाबतीत नकारात्म चर्चा ऐकावयास येत असल्याचे धुमाळ यांनी यावेळी बोलून दाखविले.

महत्वाच्या बातम्या