पंढरीच्या विठ्ठलासाठी आता सोन्याची वीट!

पंढरपूर : पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर अठ्ठावीस युगे उभा असणाऱ्या विठूरायाच्या खजिन्यात आता सोन्याची वीट जमा होणार आहे.भक्तांनी अर्पण केलेलं सोनं वितळवून, विठूरायासाठी सोन्याची वीट बनवण्यात येणार आहे. विठूरायाच्या खजिनातील 25 किलो वजनाचे सोन्याचे दागिने आणि 830 किलो चांदीचे दागिने वितळविले जाणार आहेत. यामध्ये देवाच्या पारंपरिक दागिन्यांचा समावेश नसून, देवाचे हे सर्व शेकडो अनमोल दागिने खजिन्यातच राहणार आहेत. भक्तांनी अर्पण केलेलं हे सर्व सोनं वितळवून विठूरायासाठी सोन्याची वीट बनवण्यात येणार आहे.

विठूरायाच्या दर्शनासाठी वर्षाला देशभरातून दीड कोटी भाविक येत असतात. हे विठ्ठल भक्त अनेक दान विठूचरणी अर्पण करत असतात.गेल्या अनेक वर्षांपासून विठ्ठलाचरणी दान करण्यात आलेल्या हजारो वस्तू सांभाळणे मंदिर समितीसाठी जिकीरीचे बनू लागले आहे. त्यामुळे सोने वितळवून वीट बनवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.विठ्ठलाच्या खजिन्यात 25 किलो सोने आणि 830 किलो चांदी आहे.

नुकत्याच झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाली असून, राज्य शासनाने देखील २०१५ साली एक अध्यादेश काढून देवस्थानाच्या भेट आलेल्या मौल्यवान वस्तूंबाबत सूचना दिल्या आहेत. आता याचाच आधार घेऊन मंदिर समितीने देवाच्या खजिन्यात असलेल्या 25 किलो सोने आणि 830 किलो चांदीच्या वस्तू वितळवून, त्याच्या विटा बनविण्यावर विचार सुरु केला आहे.

You might also like
Comments
Loading...