पांडेय यांचे डॅमेज कंट्रोल; कोर्टाच्या आदेशानंतर प्रियदर्शिनीत वृक्षारोपण

औरंगाबाद : सिडकोतील प्रियदर्शिनी उद्यानात मनपाच्या वतीने उभारण्यात येणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम तूर्त ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे सोमवारी दिले. या उद्यानातील अनेक झाडे तोडून स्मारक उभारण्याची मनपाची योजना आहे. मात्र कोर्टाने याबाबत फटकारल्यानंतर मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी आज लगेचच प्रियदर्शिनी उद्यानाची पाहणी केली. सोबतच वृक्षारोपणाचे आदेशही दिले. अस्तित्वात असलेल्या झाडांची काळजी न घेता नवीन झाडे लावून वृक्षप्रेमी असल्याचे चित्र पांडेय का निर्माण का करत आहेत.

प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी आज (दि.२३) प्रियदर्शिनी उद्यानाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला आणि गुरुवारी उद्यानात वृक्षारोपन करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र झाडे तोडणारे हात झाडे लावण्यासाठी कसे सरसावले हा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रियदर्शिनी उद्यान सिडकोने २०१६ मध्ये महापालिकेकडे हस्तांतरित केले. मनपाने तेथे ठाकरे स्मारक उभारण्याची योजना तयार केली. मात्र शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या उद्यानातील झाडे तोडण्यास पर्यावरणप्रेमींनी विरोध केला होता.

२०१९ मध्ये योगेश बाळसाखरे व सोमनाथ कराळे यांनी अॅड. सनी खिंवसरा यांच्यामार्फत वृक्षतोड रोखण्यासाठी जनहित याचिका दाखल केली होती. शहरातील ऑक्सिजनची गरज या उद्यानामुळे पूर्ण होत आहे. इंटरनॅशनल सर्व्हे ऑफ एन्व्हायरमेंट यांनी केलेल्या सर्वेक्षणात प्रियदर्शिनी उद्यान परिसरात शहराच्या इतर भागांच्या तुलनेत सर्वात कमी प्रदूषण असल्याचेही सिद्ध झाले आहे.

त्यामुळे येथील झाडे तोडू नयेत, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. २०१६ मध्ये प्रियदर्शनी उद्यानात ९८८५ झाडे असल्याची नोंद होती. मनपाने १० ऑक्टोबर २०१९ रोजी खंडपीठात दिलेल्या शपथपत्रात ८६७० झाडे असल्याचे नमूद केले होते.

त्यामुळे १२१५ झाडे गेली कुठे, असा प्रश्न निर्माण झाला. झाडांना पाणी मिळत नसल्याने झाडे वाळून आणि जळून जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. सोमवारी कोर्टाने दिलेल्या आदेशानंतरच मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांना जाग का आली ? असा संतप्त सवाल पर्यावरणप्रेमीनी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या