औरंगाबाद मनपा प्रशासकपदी पांडेय यांना तिसऱ्यांदा बढती

औरंगाबाद : कोरोनामुळे तसेच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिकेमुळे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक लांबतच आहे. २९ एप्रिल २०२० रोजी मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्याकडे प्रशासक पदाचा कार्यभार सोपवण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत ते प्रशासक पदी कायम आहेत. शुक्रवारी (दि.३०) राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने आदेश काढले आहेत. या आदेशानुसार पांडेय यांना तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. दुसऱ्या मुदतवाढीचा कालावधी ३० एप्रिल २०२१ पर्यंतचा आहे. त्यामुळे आता शासनाच्या नगर विकास विभागाने नवीन आदेश काढत प्रशासकांचा कालावधी वाढवला आहे.

गेल्या दिड वर्षांपासून औरंगाबाद मनपा निवडणूकीबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. निवडणूका आज होतील उद्या होतील या आशेपायी इच्छुकांनी तयारी सुरु केली होती. मात्र शपथपत्र दाखल न झाल्यामुळे मनपा निवडणूकीवर अद्यापपर्यंत सुनावणी झालेली नाही. आता सर्वोच्च न्यायालयाच्या प्रबंधकांनी औरंगाबाद महापालिका निवडणूकीसंदर्भात शपथपत्र दाखल करण्यासाठी चार आठवड्यांची शेवटची संधी दिलेली आहे. संबंधित याचिका निकाली लागल्यानंतरच औरंगाबाद पालिकेच्या निवडणुकीची पुढील दिशा ठरणार आहे.

महापालिका प्रशासकांच्या कालावधीत, पालिका निवडणुकीनंतरच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत शासनाने वाढ केली आहे. औरंगाबाद महापालिकेसह नवी मुंबई आणि वसई विरार महापालिकेची निवडणूक गतवर्षी एप्रिल महिन्यात होणार होती, पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला. त्यामुळे पालिकेचे प्रशासक म्हणून आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली. प्रशासकांच्या कालावधीस दोन वेळा मुदतवाढ शासनाने दिली आहे.

या बद्दल काढलेल्या आदेशात नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी म्हटले आहे की, राज्य निवडणूक आयोगाने संबंधित महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणखी काही कालावधी लागणार असल्याचे कळविले आहे. त्यामुळे महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतूदींनुसार औरंगाबाद महापालिकेत नियुक्त प्रशासकांचा कालावधी महापालिकेच्या आगामी निवडणुकीनंतरच्या पहिल्या सभेपर्यंत वाढविण्यास मान्यता देण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या