सोलापुरात पंचायतराज समितीच्या स्‍वागतात अवैध ‘होर्डिंग्ज’

सोलापूर –  सोलापूर जिल्हा परिषदेच्या कारभाराचा आढावा घेण्यासाठी विधीमंडळाने नियुक्त पंचायत राज समितीचा तीन दिवसांचा दौरा उद्या, बुधवारपासून सुरू होत आहे. तत्पूर्वीच या समितीच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी अवैध”होर्डिंग’ लावण्यात आले आहेत. त्यामुळे समिती सदस्यांना खूश करण्यासाठी हा प्रपंच केला नसेल ना, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कार्यकारी प्रशासनाच्या संपूर्ण प्रशासन व्यवस्थेवर सखोल, संपूर्ण प्रभावी व अर्थपूर्ण नियंत्रण आणि देखरेख ठेवण्याच्या उद्देशाने विधानमंडळ समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याच अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या पंचायत राज समितीचा पाहणी दौरा समिती प्रमुख आमदार सुधीर पारवे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, ७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.

Loading...

या दौ-यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे. यामध्ये प्रशासकीय, गावपातळीवर राबविण्यात आलेल्या विविध योजना आणि त्यांची झालेली अंमलबजावणी तसेच सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक आमदार यांच्याशी ही समिती चर्चा करुन आपला अहवाल शासनाला सादर करणार आहे. या दौ-याची जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी सुरू झाली आहे. जवळपास २८ सदस्य संख्या असलेले राज्यातील आमदार या समितीचे सदस्य असून, ते सोलापूर शहरात बुधवारी सकाळपर्यंत दाखल होणार आहेत.

या समितीच्या सदस्यांना खूश करण्यासाठी जिल्हा परिषदेने शहरातील प्रमुख ठिकाणी स्वागताचे होर्डिंग लावले आहेत. यात समिती सदस्यांचे स्वागत तसेच समितीचे प्रमुख असलेले पारवे यांचा फोटोही लावण्यात आला आहे. परंतु, सोलापूर शहरात बॅनर तसेच होर्डिंग लावण्यासाठी महापालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागाची रितसर परवानगी घेणे सक्तीचे आहे. तरीही जिल्हा परिषदेकडून जे बॅनर आणि स्वागत कमानी लावण्यात आलेल्या आहेत, त्याला महापालिकेच्या वरील विभागाची कोणतीही परवानगी घेतली गेलेली नाही.

यासंदर्भात संबंधित विभागाच्या प्रमुख सारिका आकुलवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अशा प्रकारच्या बॅनरची तसेच स्वागत कमानीची कोणतीही परवानगी घेतली नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने केवळ समिती सदस्यांना खूश करण्यासाठी केलेली ही उठाठेव तर नाही ना, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...