fbpx

पालघर पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून ‘या’ उमेदवाराच्या नावाची चर्चा

ashok chawan

मुंबई – राजेंद्र गावित यांना भाजपने तिकीट दिल्यानंतर आता पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने माजी खासदार दामू शिंगडा यांच्या नावाची पक्षश्रेष्ठींकडे शिफारस केली असून त्यांच्या उमेदवारीवर आज शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली.

भाजपाने पैसा व सत्तेचा गैरवापर करून नेत्यांची पळवापळवी सुरू केली आहे. गावित यांनी स्वार्थापोटी भाजपात प्रवेश केला असला तरी काँग्रेसशी गद्दारी करणाऱ्या गावितांना पालघर मतदारसंघातील जनताच धडा शिकवेल, अशी टीकाही चव्हाण यांनी यावेळी केली.

चव्हाण म्हणाले की, गावित गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या संपर्कात होते. काँग्रेसमध्ये राहून त्यांनी पक्षाशी गद्दारी केली. शिवसेनेने भाजपा उमेदवार पळविला, म्हणून भाजपाने गावितांना जवळ केले. सर्वांत मोठा पक्ष अशा वल्गना करणाऱ्या भाजपाला स्वत:चा एक उमेदवार मिळू नये, हे लांछनास्पद आहे. पक्षनिष्ठा वगैरे प्रकारच शिल्लक नसल्याचे गावितांच्या पक्षांतराने अधोरेखित झाल्याचंही त्यांनी यावेळी म्हंटल.