fbpx

पालघर पोटनिवडणूक; दामू शिंगडा, राजेंद्र गावित आज भरणार उमेदवारी अर्ज

मुंबई – पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँगेसकडून तब्बल पाच वेळा लोकसभा खासदार राहिलेल्या दामू शिंगडा यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. तर भाजपने कॉंग्रेसमधून आयात केलेल्या राजेंद्र गावित यांच्या नावाची घोषणा केलीये.

दरम्यान आज पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून, भाजपचे राजेंद्र गावित आणि काँगेसचे उमेदवार दामू शिंगडा आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर भाजपमधून शिवसेनेत आलेले श्रीनिवास वनगा आणि बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांनी यापूर्वीच आपला उमेदवारी अर्ज भरलाय.

पालघरमध्ये चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपचे राजेंद्र गावित, काँग्रेसचे दामू शिंगडा, शिवसेनेचे श्रीनिवास वनगा आणि बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्यात ही लढाई होणार आहे. पण चौरंगी लढत होणार असली तरी भाजपचे राजेंद्र गावित आणि शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांच्यातील लढत ही चुरशीची आणी रंगतदार होणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षाचे उमेदवार हे ऐन निवडणुकीच्या तोंडावर आयात केलेले आहेत.