मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कॉंग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

टीम महाराष्ट्र देशा : पालघर लोकसभा पोटनिवडणुकी दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपने वारंवार निवडणूक आचारसंहितेचा भंग आणि सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप करत काँग्रेसने आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागितली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांची भेट घेतली.

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्तांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला सकारात्मक उत्तर दिले असून कारवाईचे आश्वासन दिले असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळात प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, सरचिटणीस यशवंत हाप्पे, रामकिशन ओझा व चंद्रकांत दुबे आदींचा समावेश होता.

पालघर निवडणुकीत मुख्यमंत्र्यांकडून साम, दाम, दंड, भेदची भाषा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी सत्तेचा गैरवापर केला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. याबाबत निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार करुनदेखील त्यांच्याविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे.