पालघर पोटनिवडणुक; भाजपचा शिवसेनेला नवा प्रस्ताव

मुंबई – भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदार संघात होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची आज अंतिम मुदत आहे,चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवासन वनगा यांनी ही निवडणूक शिवसेनेकडून लढण्याचा निर्णय घेतल्याने पालघर पोटनिवडणुक चर्चेचा विषय ठरलीये. शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांनी दोन दिवसांपूर्वीच आपला अर्ज दाखल केलाय तर काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले राजेंद्र गावित आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे.

दरम्यान आज शेवटच्या दिवशी वनगा कुटुंबीयांना भाजपमध्ये पाठवा, त्याचं आम्ही पुनर्वसन करु, असा नवा प्रस्ताव भाजपने शिवसेनेला दिला आहे.श्रीनिवास वनगांना लोकसभेची उमेदवारी किंवा विधानपरिषदेची आमदारकी दिली जाईल, असं भाजपने म्हटलं आहे. मात्र शिवसेनेने या प्रस्तावावर अजून काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

शिवसेनेनं स्वबळाची भाषा केल्यानंतर भाजपने युतीचा प्रस्ताव दिला होता, त्यानंतर आता पालघर पोटनिवडणुकीसाठी भाजप शिवसेनेला गळ घालत आहे.पालघर पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत.