पालघर जिल्ह्यातील मूलभूत प्रश्नांचा सर्वच राजकीय पक्षांना विसर

महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे :  महाराष्ट्रात सध्या पोटनिवडणुकांचे वारे जोरात वाहत असताना त्या निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा जोरात उडत आहे. ठाणे जिल्ह्यापासून वेगळे करून नव्यानेच निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यात पण भाजपा खासदार चिंतामण वणगा यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर या जागेवर पोटनिवडणुक होत आहे. निवडणूक म्हटले की आरोप प्रत्यारोप आलेच, घोषणा, विकासात्मक हेवे दावे, जाहीरनामे व अन्य मतदारांना आकर्षित करणाऱ्या घोषणा आल्याचं व निवडणूक काळात तर यांचा पाऊसच पडत असतो. परंतु सध्या कोणत्याही निवडणूका विकासाच्या मुद्द्यावर लढताना कोणताही पक्ष दिसत नाही.

Loading...

पालघर लोकसभा पोटनिवडणुक पण याला अपवाद नसून प्रत्येक पक्षाने हाच कित्ता गिरवला असून, ज्या पालघर जिल्ह्यात पायाभूत सुविधांची कमतरता आहे त्या जिल्ह्यात सर्वपक्षीय नेत्यांनी विकासात्मक कामांच्या घोषणाचा उल्लेख करायला पाहिजे होता, परंतु त्या ठिकाणी देशपातळीवर असणारे प्रश्न किंवा पक्षीय हेवेदावे आणि बिनकामाची चिखलफेक करण्यात सर्वच पक्षांनी धन्यता मानली आहे. नवीन तयार झालेल्या जिल्ह्याच्या समस्यांवर व विकासावर भाष्य करण्यापेक्षा राजकीय चिखलफेक करण्यात येत असून मूळ मुख्य प्रश्नांना बगल देण्यात येत आहे.

देशात व राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपाने येथे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, आमदार, आसपासच्या महानगरपालिकांचे नगरसेवक व भाजपा नेते यांची फौजच प्रचार यंत्रणेत उतरवली असून, वणगा कुटुंबियांप्रती असणारी आत्मीयता संपूर्ण पालघर मधील जनतेला सांगण्यास सुरुवात केली आहे, दिवंगत खासदार वणगा यांचा फोटोही प्रचार पोस्टरवर लावून त्यांच्याचसाठी भाजपा निवडणूक लढत असून त्यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजप प्रयत्न करणार असल्याचे संपूर्ण भाजपा सांगत आहे.

अगदी बारीकसारीक नियोजनात मोठे मोठे नेते व्यग्र असून साम, दाम, दंड, भेद व येन केन प्रकारे वाटेल त्या किमतीत ही जागा जिंकायची असा अट्टाहास भाजपा करत असून त्यासंबंधी मोठ्या मोठ्या नेत्यांची आवाहने व मेसेजेस सोशल मीडियावर फिरत आहेत. स्वतः मुख्यमंत्री या सर्व निवडणुकीवर बारीक लक्ष ठेवत असून शिवसेनेला व अन्य विरोधी पक्षांना यात अस्मान दाखविणे हाच एक उद्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवला आहे असे दिसत आहे.

देशातील व राज्यातील सत्तेत वाटेकरी असणाऱ्या व दिवंगत खासदार वणगा यांच्या मुलाला उमेदवारी देणाऱ्या शिवसेनेने पण या जागेसाठी आक्रमक प्रचार केला असून भाजपा हाच त्यांनी या निवडणुकीत एक नंबर शत्रू मानला आहे. वणगा कुटुंबावर भाजपाने कशा प्रकारे अन्याय केला हेच वारंवार मतदारांना पटवून देण्याचे काम शिवसेना करत असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांचे सुपुत्र युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांसह अनेक शिवसेना मंत्री व वरिष्ठ नेते या प्रचारात नेटाने सहभागी होऊन ही जागा जिंकण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. पालघर साठी मुख्य प्रश्न कोणते आहेत यापेक्षाही बिनकामाचे मुद्दे उपस्थित करत फक्त भाजपा हेच एकमेव टार्गेट ठेवत शिवसेना प्रचार करत आहे. मुख्यमंत्री विरुद्ध ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे असे या निवडणुकीला स्वरूप आल्याचे दिसत आहे. पण जनसामान्यांचा कळवळा असल्याचे दाखवणाऱ्या शिवसेनेला मूलभूत प्रश्न का दिसत नाहीत असा प्रश्न येथील मतदारांना पडला आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने पण इथे उमेदवार दिला असून माजी मुख्यमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील यांसह अनेक मोठे मोठे काँग्रेसचे नेते इथे प्रचाराला येत असून त्यांनीही सत्तेत असणारे भाजप व शिवसेनेच्या राज्यातील व देशातील अपयशावर खापर फोडण्याचे काम चालविले असून, त्याचाच प्रचार काँग्रेस करत असल्याचे दिसत आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत सर्वच पक्षांनी पालघर मधील मूळ व मूलभूत प्रश्नांना बगल दिली असून बिनकामाच्या विषयांवर ही निवडणूक नेऊन ठेवल्याचे चित्र दिसत आहे. पालघर मधील या निवडणुकीत दिवंगत वनगा यांच्या कुटुंबीयांकडे झालेले दुर्लक्ष, उमेदवारांची पळवापळवी व इतर राजकीय मुद्द्यांवर चर्चा आरोप-प्रत्यारोप रंगत आहे. नव्याने झालेल्या पालघर जिल्ह्याचा विकास या भागातील कुपोषण, आरोग्य, शिक्षण, पाणी टंचाईसारख्या समस्या; त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्गाचा विकास, उपनगरी प्रवाशांच्या समस्या होऊ पाहणारे बुलेट ट्रेन, मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्ग, वाढवण-जिंदाल बंदर यांसारख्या विषयांवर मात्र प्रमुख राजकीय पक्षांनी मौन बाळगले आहे.

सर्वच पक्ष आपल्या राजकीय सोयीने ही निवडणूक घेत असून सर्वसामान्य मतदार यात पिचला जात असल्याची भावना इथे निर्माण झाली आहे, यात आता कोणता पक्ष बाजी मारणार व जो निवडून येईल तो पक्ष व निवडून येणारा उमेदवार नक्की या भागाचा देशपातळीवरील निधी आणून विकास करणार का हे आणि असे अनेक प्रश्न या निवडणुकीच्या निमित्ताने येथे उपस्थित होत आहेत, नाहीतर मतदान होईपर्यंत मतदार राजा जागा हो आणि संघर्षाचा धागा हो म्हणणारे सर्व पक्ष अणि उमेदवार याही निवडणुकीत निवडणूक संपल्यावर परत या भागाकडे फिरकणार का असाही सवाल या जिल्ह्यातील सर्वसामान्य मतदार करत आहेत.Loading…


Loading…

Loading...