सुषमा स्वराज यांच्या मंजुरीमुळे पाकिस्तानी महिलेला वैद्यकीय व्हिसा मिळणार

नवी दिल्ली : भारतात उपचारासाठी येण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्तानमधील कर्करोग पीडित महिलेला वैद्यकीय व्हिसा मिळवून देण्याचे आश्वासन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिले. फैजा तनवीर या पाकिस्तानी महिलेला वैद्यकीय व्हिसा मिळणार असल्याची माहिती स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. सुषमा स्वराज तुम्ही माझ्या आईसारख्या आहेत. भारतात उपचारासाठी मला वैद्यकीय व्हिसा द्यावा, असे ट्विट फैजाने केले आहे. स्वराज यांनी तात्काळ या ट्विटची दखल घेत व्हिसा मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. फैजा गेल्या खूप दिवसांपासून उपचारासाठी भारतात येण्याच्या प्रयत्नात होती. यापूर्वी फैजाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सलमान खान, गुरमीत राम रहीम आदींना ट्विट करून मदत मागितली होती.