पाकिस्तानी घुसखोराचा शेतकऱ्याला पाकिस्तानच्या हद्दीत ओढत नेण्याचा प्रयत्न

टीम महाराष्ट्र देशा : भारताच्या सीमारेषेवर केवळ दहशतवादीच नाही तर आता पाकिस्तानी नागरिकही घुसखोरी करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पठाणकोटमधील बमियालभगातील खुदाईपुर या गावात पाकिस्तानी नागरिकाने घुसखोरी करून शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना मारहाण करत या शेतकऱ्याला पाकिस्तानच्या हद्दीत ओढत नेण्याचाही प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

शेतकरी सुखबीर सिंह लक्खा त्याच्या सीमेलगतच्या शेतात काम करत होता. यावेळी अचानक पाकिस्तानी नागरिक तेथे आला. त्याने सुखबीरना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांना ओढत पाकिस्तानच्या हद्दीत नेण्याचा प्रयत्न झाला. यावेळी सुखबीर यांनी आरडाओरडा केल्याने आजुबाजुच्या शेतात काम करणारे शेतकरी त्यांना वाचविण्यासाठी धावले. हे पाहून पाकिस्तानी नागरिक पळून गेला. त्याच्यासोबत अन्य तीन जण शस्त्रांसह होते, असे सांगितले जात आहे. हे सर्वजण पाकिस्तानी रेंजर पोस्टच्या दिशेने गेले. हा धक्कादायक प्रकार पाकिस्तानी रेंजरकडूनच केल्याची शंका उपस्थित केली जात आहे.