पाकिस्तानात गेलेल्या चंदू चव्हाणांची सुटका

पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय जवान चंदू चव्हाण याची आज पाकिस्तानकडून सुटका करण्यात आली आहे. तब्बल चार महिन्यांनी तो मायदेशी परतला आहे. चंदू चव्हाण हा नजरचुकीने पाकिस्तानच्या हद्दीत गेला होता. २९ सप्टेंबरपासून तो पाकिस्तान सैन्याच्या ताब्यात होता.

मूळचा धुळ्याचा असलेला चंदू चव्हाण ३७ राष्ट्रीय रायफल्समध्ये सेवा बजावत होता. ३० सप्टेंबरला गस्त घालत असताना चंदू चव्हाण याने नजरचुकीने सीमा ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केला होता. यानंतर चंदू चव्हाणला पाकिस्तानच्या सैन्याने ताब्यात घेतले होते. तेव्हापासून चंदू चव्हाण पाकिस्तानच्या ताब्यात होता. आपला नातू चंदू चव्हाणला पाकिस्तानने ताब्यात घेतल्याचा धक्का सहन न झाल्याने त्याची आजी लीलाबाई चिंधा पाटील (चव्हाण) यांचे निधन झाले होते. चंदू चव्हाण हा २३ वर्षांचा असून, तो मुळचा धुळे जिल्ह्यातील बोरविहीर येथील आहे. लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्समध्ये तो सेवेत आहे.

भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले होते. या कारवाईत भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त केले होते. यावेळी तब्बल ३८ अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. त्यानंतर काही वेळातच चंदू चव्हाण हा पूंछ येथील नियंत्रण रेषेजवळून पाकिस्तानच्या हद्दीत गेला होता. पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून भारतीय सैनिकाला पकडल्याचे सांगण्यातही आले होते. नकळत नियंत्रण रेषा ओलांडल्यामुळे पाकिस्तानच्या तावडीत सापडलेला राष्ट्रीय रायफल्सचा जवान चंदू चव्हाण ताब्यात असल्याची कबुली पाकिस्तानने दिली होती. पाकिस्तानच्या लष्करी कारवाई प्रमुखांनी (डीजीएमओ) चंदू चव्हाणला इस्लामाबादमध्ये ठेवण्यात आल्याचे सांगितले जात होते. यापूर्वी भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी लष्कराच्या आयएसपीआर या प्रसारमाध्यम विभागाशी संपर्क साधण्यात आला तेव्हा त्यांनी आमच्या ताब्यात कोणताही भारतीय सैनिक नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे चंदू चव्हाणच्या सुटकेची शक्यता धुसर झाली होती. मात्र, केंद्र सरकारने त्याच्या सुटकेसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले होते. चंदू चव्हाणच्या सुटकेबाबत पाकिस्तानच्या डिजीएमओंसोबत चर्चा झाल्याचे केंद्र सरकारने सांगितले होते. तो सुरक्षित असून त्यांची चौकशी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती पाकिस्तानच्या डिजीएमओंनी दिली होती. चंदू चव्हाण यांची लवकरच मुक्तता करण्यात येईल, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आल्याची माहिती सरकारने दिली होती. चंदू चव्हाण याच्या सुटकेसाठी डिजीएमओ स्तरावर बातचीत सुरू होती. भारताच्या डिजीएमओंनी १५ ते २० वेळा पाकिस्तानच्या डिजीएमओंसोबत संवाद साधला होता. त्यांनी चंदू चव्हाण सुरक्षित असून लवकरच त्यांची सुटका केली जाईल, असे म्हटले होते, अशी माहिती केंद्र सरकारने दिली होती. केंद्र सरकारच्या प्रयत्नांना यश आले असून, आज, शनिवारी चंदू चव्हाणची सुटका केली आहे.

यानंतर चंदू चव्हाण सुखरूप असून लवकरच त्यांना मायदेशी आणण्यात येईल, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी एका कार्यक्रमादरम्यान दिली होती. अखेर आज केंद्र सरकारच्या प्रयत्नांना यश आले असून चंदू चव्हाण मायदेशी परतले आहेत.
जळगावात आनंदोत्सव
चंदू चव्हाण यांची सुटका झाल्याने जळगावात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. कल्याणी नगर येथे राहणा-या त्यांच्या काकू लताबाई पाटील यांनी साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला.