fbpx

पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान शहीद

टीम महाराष्ट्र देशा- पाकिस्तानकडून सीमावर्ती भागात शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या घटना थांबायचं नाव घेत नाही आहे. आज पहाटे जम्मू-काश्मीरच्या आर. एस. पुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला आहे.

गुरुवारी रात्रीपासून आरएस पुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानसोबत सुरू झालेली चकमक अजूनही सुरूच आहे. पाकिस्तानने बीएसएफ पोस्ट आणि स्थानिक नागरिकांना लक्ष्य केलं असून त्यांच्यावर मोर्टार डागायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय जवानही जशास तसे उत्तर देत आहेत. दरम्यान, अरनिया येथील नागरिकांना घराच्याबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली असून अर्नी, बिश्नाह आणि आरएस पुराच्या परिसरात नियंत्रण रेषेपासून तीन किलोमीटरच्या अंतरावरील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पाकिस्तानच्या या हल्ल्यात बीएसएफचे कॉन्स्टेबल सीताराम उपाध्याय शहीद झाले. उपाध्याय हे झारखंड येथील रहिवासी असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.