‘पाकिस्तान म्हणजे टेररिस्तान’ संयुक्त राष्ट्रात भारताचा पाकिस्तानवर पलटवार

सीमेवरील पाकिस्तानच्या कुरापतीमुळे एका बाजूला भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर दुसरीकडे संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या फर्स्ट सचिव एनएम गंभीर यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानवर जोरदार पलटवार केला. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांनी संयुक्त राष्ट्र आमसभेत बोलताना काश्मीर मुद्द्यावरून भारताला टार्गेट करत पाकिस्तानच दहशवादाचा शिकार असल्याचा कांगावा केला होता. तसेच काश्मीर प्रश्न शांततापूर्ण मार्गाने सोडवला पाहिजे, असा सल्ला देखील दिला होता.

यावर गंभीर म्हणाल्या की, पाकिस्तानच्या नावाचा अर्थ पवित्र भूमी असा होतो. मात्र, हा देश आता टेररिस्तान झाला आहे. ज्यांच्याकडून दहशतवाद्यांना आश्रय दिला जात आहे, त्यांनी जगाला मानवाधिकार आणि लोकशाहीचे धडे शिकवू नये. पाकिस्तानात दहशतवादी खुलेआम फिरतात. ज्या देशाने ओसामा आणि मुल्ला उमरला आश्रय दिला तोच आज स्वतःला पिडीत म्हणून घेत आहे.