…म्हणून त्या पाकिस्तानी तरुणाला मरायचं होतं भारतीय जवानांकडून

श्रीनगर : आपल्या प्रियसी सोबत लग्न न झाल्याने हताश झालेल्या पाकिस्तानी तरुणाने आपला मृत्यू व्हावा यासाठी थेट सीमारेषा गाठली. सीमारेषेवर भारतीय बीएसएफ जवान गोळ्या घातलील आणि आपला मृत्यू होईल अशी या तरुणाला अपेक्षा होती. मात्र बीएसएफने या तरुणाला न मारता अटक केली आहे. मोहम्मद आसीफ असं या ३२ वर्षीय तरूणाचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या प्रेयसीलाही त्याच्याशी लग्न करायचं होतं. पण जबरदस्तीने तिचं दुसऱ्यासोबत लग्न लावून देण्यात आलं. लग्नानंतर काही दिवसातच तिचा घटस्फोट झाला. यानंतर पुन्हा एकदा आसिफने तिच्या कुटुंबियांकडे लग्नाची मागणी घातली. पण त्यांनी पुन्हा एकदा नकार दिला. शेवटी त्याने हताश होऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

मात्र आसीफने सुरुवातीला गळफास लावून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र रमझानच्या पवित्र महिन्यात अशा गोष्टी करण्याची परवानगी नसल्याने त्याने आपला प्लान बदलला. आणि मरण्यासाठी त्याने थेट भारत -पाकिस्तान सीमारेषा गाठली मात्र भारतीय सैनिकांनी त्याला न मारता अटक केलीये. अधिक चौकशी सुरु असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले.