पैठण पोलिस निरिक्षकाने दिली पत्रकाराला धमकी

पैठण / टीम महाराष्ट्र देशा  :-   शहरातील सत्य घडामोडीच्या बातम्या प्रकाशित केल्याचा राग मनात धरून पैठण पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक चंदन ईमले यांनी एका पत्रकाराला चक्क स्वता:च्या कँबीनमध्येच गैरवर्तन केल्याची घटना उघडकीस आली आहे.  माझ्या विरोधात बातमी प्रकाशित का करत आहेस , तुला बघुन घेतो व खोट्या गुन्ह्यातच गोवतो असे म्हणत अपमानास्पद वागणुक देत कँबीनमधुन हाकलून दिल्याची लोकशाहीला काळीमा फासणारी व निंदनिय घटना दि ८ गुरूवार रोजी घडली.

शहरातील तंबाखू ,बिडी ,गुटखा सिगारेट विकणा-या टपरी ८ ते १० चालकावर पोलिस निरिक्षक ईमले यांच्या मार्गदर्शनाखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली होती . या प्रकरणी पत्रकार मुफिद पठाण यांना माहिती मिळताच औरंगाबाद जिल्ह्या गुन्हेशाखेचा व्हॉटस्अप ग्रुप आहे. ज्यात जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व पत्रकार आहेत . या व्हॉटस्अप ग्रुपवर कारवाईचा संदेश सोडल्याने ईमले यांचा पारा चढला व वृतांकनसाठी गेलेल्या पत्रकार मुफिद पठाण यांना अपमानास्पद वागणुक देत तु या आगोदर देखील माझ्या विरोधात बातम्या प्रकाशित केल्या आहेस . तु मला ओळखलं नाही . तुला मी  खोट्या गुन्ह्यात गोवतो  मग तुला दाखवतो पोलिसी हिसका असे म्हणत अपमानास्पद वागणूक देत पत्रकार मुफिद पठाण यांना  कँबीन मधून हाकलून दिल्याची माहिती पत्रकार पठाण यांनी महाराष्ट्र देशाशी बोलताना दिली.

त्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करणार, पोलीस अधिक्षक डाँ.आरती सिंह यांचे आश्वासन….

दरम्यान सदर प्रकरणी  पञकार संघटनेच्या शिष्टमंडळाने औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधिक्षक आरती सिंह यांना भेटुन आपल्या मागण्याचे निवेदन दिले, यामध्ये पैठणचे पोलीस निरीक्षक चंदन ईमले यांना तात्काळ निलंबीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी निवेदनाची दखल घेत पोलीस अधिक्षक आरती सिंह यांनी घटनेची चौकशी करून  त्या पोलिस निरीक्षकावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

या प्रकरणाची ‘महाराष्ट्र देशा’ने अधिक माहिती घेतली असता संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या दबावामुळे हे प्रकरण दाबण्यात येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता  मुजोर पोलीस अधिकाऱ्यावर पोलीस अधिक्षक आरती सिंह खरच कारवाई करणार का?,  हे येत्या काही काळात स्पष्ट होईल. मात्र, या अधिकाऱ्यासोबतचे आपले हितसंबंध जपण्यासाठी काही पत्रकारमंडळी सुद्धा पत्रकारितेचा धर्म विसरून सत्याच्या बाजूने उभे राहण्याऐवजी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याच समोर येत आहे.

पोलीस अधिक्षक आरती सिंह यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले आहे, तर दुसऱ्या बाजूला पोलिस निरिक्षक ईमले यांनी मात्र असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा केला आहे. ईमले यांनी सांगितल्यानुसार मान्य केल्यास एक सामान्य पत्रकार एका पोलीस अधिकाऱ्याची अशाप्रकारे बदनामी का? करेल याचे उत्तर देखील गुलदस्त्यात आहे. विशेष म्हणजे हे सर्व प्रकरण घडत असताना दोन वरिष्ठ पत्रकार देखील त्याठिकाणी उपस्थित होते. त्याठिकाणी उपस्थित असणारे पत्रकार पारदर्शक भूमिका घ्यायचे सोडून कशा पद्धतीने दुटप्पी भूमिका घेत आहेत हे ‘महाराष्ट्र देशा’च्या हाती लागलेल्या ऑडियो क्लीपमधून स्पष्ट होत आहे. त्यामुळे या पत्रकारांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे.