विकास प्राधिकरणाची २८ कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी

पैठण (किरण काळे पाटील) – आपेगाव विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पैठण शहराचा येत्या वर्षभरात विकासात्मक कायापालट करण्याचा प्रयत्न आपण करणार असुन प्राधिकरणातुन आतापर्यंत झालेली विकास कामे अत्यंत नित्कृष्ट दर्जाची झाली असुन यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करुन ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष नवलकिशोर राम यांनी दिली .
पैठण तहसिल कार्यालयात जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली विकास प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विकास प्राधिकरणातुन १६ कोटी रुपये खर्चाचा सह्याद्री हॉटेल ते पाटेगाव रस्ता, भाजी मार्केट ते नेहरु चौक रस्ता,  नेहरू चौकात  ४ कोटीची पाणीपुरवठा योजना, ७ कोटी रुपये खर्चाची घनकचरा योजना आदी कामांना मंजुरी देण्यात आली.
या बैठकीस सह अध्यक्ष तथा आमदार संदिपान पा. भुमरे, उपाध्यक्ष तथा नगराध्यक्ष सुरज लोळगे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, तहसीलदार महेश सावंत, दुध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, महेश जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना जिल्हाधिकारी नवलकिशोर राम म्हणाले की, आतापर्यंत प्राधिकरणातुन झालेले रस्ते , भुमिगत गटार योजना व इतर कामे अत्यंत नित्कृष्ट दर्जाची झालेली आहे.
४६ कोटीच्या गटार योजनेचे काम तीन टप्प्यात असुन केवळ २० टक्केच काम झालेले आहे मात्र हे काम अत्यंत बोगस असल्याची कबुली एका टप्प्यातील ही योजना तीन टप्प्यात करणे हे बेकायदेशीररित्या असल्याचे  सांगुन हे काम एकाच टप्प्यात होणे अपेक्षित होते अशी टिप्पणी केली.
आता यापुढे प्राधिकरणाची कामे सध्याच्या ठेकेदारांना न देता निष्कलंक ठेकेदारांना देण्यात येतील असे सांगितले. तसेच प्राधिकरणामार्फत झालेल्या कामांची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई प्रास्तावित करण्यात येईल तसेच ठेकेदारांनाही काळया यादीत टाकण्यात येईल असे शेवटी बोलतांना जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष दत्ता पा. गोर्डे, आबासाहेब बरकसे, भुषण कावसनकर, तुषार पाटील, ईश्वर दगडे, कृष्णा मापारी, सतिष पल्लोड, दिलीप मगर यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.