पैठण-औरंगाबाद चौपदरी रस्त्याचे काम लवकरच होणार पूर्ण!

पैठण : पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यान पुनर्विकासासह रस्त्याच्या चौपदरीकरणाचा आराखडा वास्तुरचनाकार पी. के. दास यांनी तयार केलेला असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, व मुख्य सचिव यांच्या उपस्थितीत आराखड्याचे सादरीकरण होणार आहे. यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली असल्याचे रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.

मंत्री भुमरे म्हणाले कि, तालुक्यासाठी वॉटर ग्रीड योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच औरंगाबाद-पैठण चौपदरीकरण रस्त्याचे अंदाज पत्रक तयार करून दोन ते तीन महिन्यात या कामाला सुरुवात केली जाणार आहे. पैठण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने येथील काही कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासल्यास याठिकाणी ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांना औरंगाबाद येथे हलविण्यात येते. ही गैरसोय होऊ नये म्हणून पैठण तालुक्यातील पाचोड व पैठण शहरात अशा दोन ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती (प्लँट)तयार करण्यात येणार असल्याचे ही यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री भुमरे यांनी सांगितले.

पैठण शहरातील संत ज्ञानेश्वर उद्यानात तालुक्यातील फळ बाग धारक शेतकऱ्यांसाठी भव्यदिव्य असे मोसंबी संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. संतपीठ दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला असून सध्या काम सुरू आहे. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावामुळे पैठण तालुक्यातील विविध विकास कामांना खीळ बसली असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. योगा योगाने पक्षाने हि संधी उपलब्ध करून दिल्यामुळे तालुक्यातील प्रलंबित असणाऱ्या सर्व विकास कामांना गती मिळणार असल्याचेही यावेळी मंत्री भुमरे यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता आपेगाव हिरडपुरी बंधाऱ्यात एक दोन दिवसात पाणी सोडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या