‘पगडी पॉलिटिक्स’ : विद्यार्थ्यांना हवी ती पगडी घालण्याची परवानगी द्या;राष्ट्रवादीची मागणी

टीम महाराष्ट्र देशा – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काल पदवीप्रदान सोहळ्यात पुणेरी पगडीवरून वादंग झाला. पदवीप्रदान समारंभातील गाऊन हद्दपार केला गेला, स्नातकांनी पारंपरिक पोशाख घालावा अशी सिद्धता केली गेली. परंतु पुणेरी पगडीचा आग्रह सक्तीचा ठेवला गेला. यावर विद्यार्थी संघटनांनी पुणेरी पगडीच्या निषेधाची भूमिका घेतली.

यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे म्हणाले, हा असा अचानक बदल करावा अशी मागणी कुणी केली नव्हती असा दावा केला आहे.स्नातकांनी पारंपरिक पोशाख करावा अशी अपेक्षा होती तर त्यांना पगडीही त्याच्या आवडीप्रमाणे घालण्याची मुभा देणे आवश्यक होते. एकतर कोणतीच पगडी नको किंवा मग ज्याला हवी ती पगडी घालण्याची परवानगी देणे आवश्यक आहे असं काकडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,या वादाला पार्श्वभूमी आहे ती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पुण्याच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना पुणेरी पगडी टाळून फुले पगडी घातली होती.तर यापुढे पुणेरी पगडी टाळून फुले पागोटे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात वापरले जाईल असे आदेश राष्ट्रवादी काँगेसच्या कार्यकर्त्यांना पवारांनी दिले होते.जातीयवादाला खतपाणी घातल्याची चौफेर टीका त्यावेळी देखील झाली होती. यानंतर सर्वत्र नाचक्की झाल्यानंतर पवारांना बरीच सारवासारव करावी लागली होती.त्यामुळे पुण्यात सुरु असलेल्या पगडीच्या या वादाची ठिणगी पवारांच्या याच कार्यक्रमात पडली असल्याची चर्चा आहे.