पद्मावतीमध्ये दीपिका ऐवजी माधुरीला घ्या – रामदास आठवले.

टीम महाराष्ट्र देशा – पद्मावती सिनेमाला देशभरातून राजपूत संघटना आणि भाजपच्या काही नेत्यांकडून विरोध होत असताना रिपाइंचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मात्र त्याला पाठिंबा दर्शवला अाहे. तसेच ‘पद्मावती’ चित्रपटावरून अभिनेत्री दीपिका पादुकोणला तिचे नाक कापण्याच्या तसेच दिग्दर्शक भन्साळी यांना दिल्या जाणाऱ्या धमक्या अत्यंत चुकीच्या असल्याचे आठवले म्हणाले. दीपिकाच्या रूपातील राणी पद्मावतीचे नृत्य समाजाच्या भावना दुखावणारे असेल तर दीपिकाच्या जागी माधुरी दीक्षितला सिनेमात नृत्यासाठी घ्यावे, अशी सूचनाही आठवले यांनी केली.

पद्मावती सिनेमा राजपूत समाजाची प्रतिष्ठा वाढवणारा आहे. यामधून राजपूत समाजाचा गौरवशाली इतिहास दाखवला जाणार आहे. पद्मावती राणीचा शूरपणा दाखवला आहे. मात्र काही दृश्यांवर समाजाचा आक्षेप आहे. यातील आक्षेपार्ह दृश्ये वगळून पद्मावती सिनेमा प्रदर्शित करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. भन्साळींनी पद्मावती सिनेमा कुठल्याही समाजाचा अपमान करावा म्हणून निर्मित केलेला नाही. ते प्रतिभावान दिग्दर्शक आहेत. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने निर्णय घ्यावा, असे सांगत कलाकारांचा सन्मान होणे गरजेचे असल्याचे आठवले म्हणाले.