पद्मावत चित्रपटाच्या विरोधकांकडून वडगाव पुलाजवळ वाहनांची तोडफोड

पुणे- पद्मावत चित्रपटाच्या विरोधकांकडून एका ट्रक चालकास अडवून त्याच्या ट्रकसह रस्त्याच्या बाजूला लावलेल्या अन्य वाहनांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी महेश भापकर (वय 30, रा. डोंबिवली) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. ऑर्डरप्रमाणे ते मालाची डिलिवरी करतात. साखरवाडी येथून कुर्ला चेंबूर येथे ते आयशर गाडी (एम एच 11/ ए एल 6282) घेऊन ड्रायव्हर महेश मदणे याच्या सोबत निघाले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास ते वडगाव पूल क्रॉस करून वारजे पुलाकडे जात असताना 20 ते 25 जण हातात भगवे झंडे घेऊन आले. त्यांनी ट्रकची काच फोडून टायरमधील हवा सोडून दिली. तसेच त्यांच्या गाडीच्या मागील बाजूस उभ्या असलेल्या अन्य वाहनांची तोडफोड केली.

यावेळी आम्ही पद्मावत चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. अशा मोठमोठ्या घोषणा ते देत रस्ता रोखून धरला होता. आपल्या कामात विनाकारण अडथळा आणून अडवणूक करून वाहनाची तोडफोड केल्या प्रकरणी महेश यांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Comments
Loading...