पी. व्ही. सिंधूने कोरले वर्ल्ड टूर फायनल्सच्या विजेतेपदावर नाव

टीम महाराष्ट्र देशा : जागतिक रौप्यविजेत्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनं ग्वांगझूमधल्या वर्ल्ड टूर फायनल्सच्या विजेतेपदावर आपलं नाव सुवर्णाक्षरात कोरलं. सिंधूने अंतिम फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहाराचं कडवं आव्हान 21-19, 21-17 असं मोडीत काढलं.

सिंधूचं वर्ल्ड टूर फायनल्सचे हे पहिलेवहिले विजेतेपद ठरले आहे. याआधी 2017 च्या वर्ल्ड टूर फायनल्समध्ये सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. सिंधूचा हा कारकिर्दीतील 300 वा विजय ठरला. सलग सात पराभवानंतर अखेर सिंधूने आज विजेतेपद पटकावले. या वर्षात सिंधूने एकही विजेतेपद जिंकले नव्हते. त्यामुळे हे विजेतेपद पटकावून तिने हंगामाचा शेवट गोड केला आहे.

काल सिंधूने उपांत्य फेरीत रॅट्चनॉक इंटानॉन हिला 21-16, 25-23 अशी सरळ मात दिली. पहिला सेट सिंधूने सहज जिंकला होता. पण दुसऱ्या सेटमध्ये इंटानॉनने तिला चांगलीच झुंज दिली. त्याआधीही सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या झँग बीवन हिला 21-9, 21-15 अशा सरळ गेममध्ये पराभूत केले. पहिल्या सेटमध्ये सिंधूने बीवन हिला 21-9 अशा मोठ्या फरकाने पराभूत केले आणि सामन्यात आघाडी घेतली. त्यानंतर बीवनने सिंधूला दुसऱ्या सेटमध्ये चांगली टक्कर दिली. पण अखेर सिंधूचे प्रयत्न यशस्वी ठरले. दुसरा गेम २१-१५ असा जिंकत तिने उपांत्य फेरीत धडक मारली होती.

You might also like
Comments
Loading...